‘साहेब... एकच नंबर काम!’; महसूल मंत्री बावनकुळेंच्या जनसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमाला हजारोंचा प्रतिसाद. मंत्र्यांनी हजारांहून अधिक नागरिकांची निवेदने स्वीकारून समस्या ऐकून घेत दिलासा दिला.

Aug 23, 2026 - 23:58
 0  11
‘साहेब... एकच नंबर काम!’; महसूल मंत्री बावनकुळेंच्या जनसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, कोल्हापूर जनसंवाद, जनसंवाद कार्यक्रम, नागरिकांची निवेदने, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग, बावनकुळे जनसंवाद

प्रतिनिधी: उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. २३ (जिमाका) : रविवारची सुट्टी असूनही जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुपारनंतर हजारो नागरिकांच्या गर्दीने गजबजून गेला. कारण होते राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम. जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या विविध मागण्या आणि समस्या घेऊन मंत्र्यांची भेट घेतली. नागरिकांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत, त्यांची निवेदने स्वीकारत आणि शक्य त्या प्रकरणांमध्ये तातडीने मार्गदर्शन करत महसूलमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

दुपारी चारच्या सुमारास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यावेळी कार्यालयाच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नागरिकांची संख्या लक्षात घेता मंत्री बावनकुळे यांनी “जोपर्यंत शेवटच्या नागरिकाचे निवेदन स्वीकारत नाही, तोपर्यंत हे व्यासपीठ सोडणार नाही,” असा दिलासा उपस्थितांना दिला.

मंत्र्यांच्या या भूमिकेचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे म्हणणे महसूलमंत्री अत्यंत आपुलकीने ऐकून घेत असल्याचे पाहून अनेक नागरिकांनी “साहेब... एकच नंबर काम!” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

हजारांहून अधिक निवेदने स्वीकारली

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या जनसंवाद कार्यक्रमात महसूल मंत्री बावनकुळे यांनी हजारांहून अधिक नागरिकांची निवेदने स्वीकारली. प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांनी संबंधित विषयाची माहिती जाणून घेतली. शक्य असलेल्या प्रकरणांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या, तर काही प्रकरणांमध्ये नागरिकांना वस्तुस्थिती स्पष्ट करून मार्गदर्शन करण्यात आले.

नागरिकांच्या चेहऱ्यावर असलेली चिंता दूर करण्यासाठी मंत्री बावनकुळे यांनी आश्वासक शब्दांत संवाद साधला. आपल्या समस्या थेट महसूलमंत्र्यांपर्यंत पोहोचवता आल्याने अनेक नागरिकांना समाधान मिळाले.

थेट संवादातून नागरिकांना दिलासा

जनसंवाद कार्यक्रमाचा उद्देश केवळ निवेदने स्वीकारणे नसून नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर मार्ग काढण्याचा असल्याचे यावेळी दिसून आले. महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्नांसह नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या.

महसूलमंत्र्यांनी नागरिकांच्या निवेदनांकडे गांभीर्याने पाहत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. काही प्रकरणांमध्ये उपलब्ध कायदेशीर तरतुदी आणि प्रशासकीय प्रक्रियेची माहिती नागरिकांना देण्यात आली. त्यामुळे “आपले म्हणणे ऐकून घेणारे प्रशासन आहे,” अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली.

लोकप्रतिनिधी व प्रशासनाची उपस्थिती

या जनसंवाद कार्यक्रमास आमदार अमल महाडिक, आमदार अशोक माने, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, करवीर प्रांत अधिकारी मोसमी चौगुले, डॉ. समीर शिंगटे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रविवार असूनही नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या जनसंवादामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महसूलमंत्र्यांनी शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचत त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याने कार्यक्रमाची सांगता नागरिकांच्या समाधानाच्या भावनेत झाली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.