सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरण वास्तूचे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयाच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जुलैच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यावेळी शेंडा पार्क येथील विविध विकासकामांचाही आढावा घेण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी उमेश जाधव
कोल्हापूर, दि. २५ (जिमाका) : छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या नव्या वास्तूचे लोकार्पण पावसाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जुलैच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
शेंडा पार्क येथील सभागृहात आयोजित बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी तेथे सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आणि सुविधांचा आढावा घेतला. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, माजी अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, डॉ. गिरीश कांबळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या १२५ निवासी महिला व पुरुष डॉक्टरांसाठीचे वसतिगृह, प्रत्येकी १५० विद्यार्थ्यांच्या क्षमता असलेली मुलांचे व मुलींचे वसतिगृह, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस कोर्ट, विश्रामगृहाचे नूतनीकरण, एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या जुन्या वसतिगृहाचे नूतनीकरण तसेच १५० क्षमतेच्या नर्सिंग हॉस्टेल व प्रशिक्षण केंद्राच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
मंत्री मुश्रीफ यांनी उर्वरित सर्व कामे येत्या वर्षाअखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच पाणीपुरवठा, रस्ते, वीज आणि एसटीपी (सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट) यांसारख्या मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना दिल्या.
यावेळी त्यांनी सीपीआर रुग्णालयातील अपूर्ण विकासकामांचाही स्वतंत्रपणे आढावा घेतला आणि ती वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. बुरुड, डॉ. अनिता सैबनवार, प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप, महापालिकेचे जल अभियंता हर्षदीप घाटगे, कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, कार्यालयीन अधीक्षक समीर मोमीन तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0