नेतृत्वगुण शिकायचे असतील तर अटलजींचे जीवन अभ्यासा'; राज्यपालांच्या हस्ते 'अटल संस्मरण' ग्रंथाचे प्रकाशन

मुंबईतील महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते 'अटल संस्मरण' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वगुण, राजकीय शालीनता आणि नीतिमत्तेचा भावी पिढ्यांनी अभ्यास करावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

नेतृत्वगुण शिकायचे असतील तर अटलजींचे जीवन अभ्यासा'; राज्यपालांच्या हस्ते 'अटल संस्मरण' ग्रंथाचे प्रकाशन
अटल संस्मरण, अटल बिहारी वाजपेयी, जिष्णु देव वर्मा, महाराष्ट्र लोकभवन, अशोक टंडन, आशिष शेलार, पुस्तक प्रकाशन,

मुंबई प्रतिनिधी | देवानंद शिंदे 

मुंबई | प्रतिनिधी : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सार्वजनिक जीवनावरील आठवणींचे संकलन असलेल्या 'अटल संस्मरण' या ग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना, नेतृत्वगुण, राजकारणातील शालीनता आणि नीतिमत्ता शिकायची असेल तर भावी पिढीने अटलजींच्या सार्वजनिक जीवनाचा अभ्यास करावा, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे माजी माध्यम सल्लागार अशोक टंडन यांनी हे पुस्तक लिहिले असून, अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्याचे प्रकाशन करण्यात आले.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन आपण राजकारणात आलो. विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधान या दोन्ही भूमिकांमध्ये त्यांनी शालीनता, संयम आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचा आदर्श घालून दिला. संकटाच्या काळातही त्यांनी आपल्या वैचारिक भूमिकेशी तडजोड केली नाही, असे त्यांनी नमूद केले.

भारतीयतेची संकल्पना स्पष्ट करताना राज्यपालांनी अटलजींनी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांना दिलेल्या उत्तराचा उल्लेख केला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, अणुऊर्जा यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना नैतिकता आणि मूल्यांची जपणूक आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी 'अटल संस्मरण' हा उच्च साहित्यिक मूल्य असलेला आणि अटलजींच्या जीवनावर प्रकाश टाकणारा महत्त्वपूर्ण दस्तावेज असल्याचे सांगितले. लेखक अशोक टंडन यांनी अनेक वर्षे अटलजींसोबत काम केल्यामुळे या पुस्तकातील अनुभव वस्तुनिष्ठ, प्रेरणादायी आणि अंतर्मुख करणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेलार म्हणाले की, अटलजी संघर्षमय परिस्थितीतही सकारात्मक राहिले. ते उत्कृष्ट वक्ते, सुसंस्कृत राजकारणी आणि लोकशाहीतील संवादाचे समर्थक होते. सहमतीच्या राजकारणाचा आदर्श त्यांनी देशासमोर ठेवला. अणुचाचण्यांनंतर आंतरराष्ट्रीय निर्बंध आले तरी त्यांनी ठाम नेतृत्व दाखविले, असेही त्यांनी सांगितले.

लेखक अशोक टंडन यांनी अटलजींसोबतच्या सहा वर्षांच्या कार्यकाळातील अनेक आठवणी सांगितल्या. १३ दिवसांचे सरकार स्थापन होण्यामागील घडामोडी आणि त्या काळातील राजकीय घटनांवरही त्यांनी प्रकाश टाकला. हे पुस्तक अटलजींना समर्पित श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला गायक अनूप जलोटा, रवींद्र संघवी, बिनॉय बी. यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.