राज्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवांमुळे काही जिल्ह्यांत पेट्रोल विक्रीत ४० टक्क्यांहून अधिक वाढ
राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधनटंचाई नसल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. अफवांमुळे काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीत मोठी वाढ झाल्याने नागरिकांनी घाबरून अतिरिक्त खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले.
मुंबई, दि. २५ : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राज्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल-डिझेल वितरण व्यवस्थेच्या आढावा बैठकीत मंत्री छगन भुजबळ बोलत होते. या बैठकीला अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, राज्य शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे तसेच विविध तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, काही भागांत इंधनटंचाईच्या अफवा पसरल्यामुळे नागरिकांकडून अतिरिक्त खरेदी केली जात आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यात पेट्रोल विक्रीत सुमारे २३ टक्के तर डिझेल विक्रीत तब्बल ५२ टक्के वाढ झाली आहे. काही जिल्ह्यांतील वाढ विशेष लक्षवेधी ठरली आहे.
जिल्हानिहाय पेट्रोल विक्री वाढ :
• अकोला – ४४ टक्के
• बुलढाणा – ४७ टक्के
• जालना – ४९ टक्के
• वर्धा – ४३ टक्के
मंत्री छगन भुजबळ यांनी तेल कंपन्यांना जिल्हा आणि तालुका स्तरावर जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना इंधन उपलब्धतेबाबत सातत्याने माहिती देऊन अनावश्यक भीती दूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, काही किरकोळ घटनांच्या आधारे चुकीची माहिती पसरविली जात असून त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि तेल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणातील अतिरिक्त खरेदीवर लक्ष ठेवून साठेबाजी रोखावी.
दरम्यान, बैठकीत एलपीजी आणि पीएनजी गॅस उपलब्धता तसेच वितरण व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
राज्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून अतिरिक्त इंधन खरेदी करू नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0