नाशिकमध्ये ४ थी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा; २-३ मे रोजी भव्य आयोजन

नाशिकच्या हिरावाडी येथील विभागीय क्रीडा संकुलात २ व ३ मे रोजी ४ थी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा होणार असून राज्यभरातून हजारो खेळाडू सहभागी होणार आहेत.

Apr 14, 2026 - 23:58
 0  83
नाशिकमध्ये ४ थी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा; २-३ मे रोजी भव्य आयोजन
नाशिक ॲथलेटिक्स स्पर्धा, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा, हिरावाडी क्रीडा संकुल, athletics competition Nashik, Maharashtra sports event, athletics 2026

नाशिक ब्युरो :

नाशिकच्या क्रीडा नगरीत आगामी २ आणि ३ मे २०२६ रोजी आमंत्रित ‘४ थी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा’ भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. पंचवटीतील हिरावाडी येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धावपट्टीवर ही स्पर्धा पार पडणार असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो खेळाडू यात सहभागी होणार आहेत.

या दोन दिवसीय स्पर्धेत ६ ते १८ वर्षे व खुल्या गटातील मुला-मुलींसाठी धावणे, लांब उडी, गोळाफेक यांसह तब्बल ९६ क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन व डीएसओच्या नियमांनुसार होणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणि राज्यस्तरावर ओळख निर्माण करण्याची ही मोठी संधी ठरणार आहे.

स्पर्धेची प्रमुख आकर्षणे म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाची धावपट्टी, इलेक्ट्रॉनिक टाइम व डिस्टन्स मोजमाप प्रणाली, विजेत्यांसाठी पदके, ट्रॉफी, प्रमाणपत्रे, तसेच राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. टीम चॅम्पियनशिप, उत्कृष्ट खेळाडू व उत्कृष्ट प्रशिक्षक यांचीही निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.

नाशिक महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि ‘फिट इंडिया’ यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. आतापर्यंत १८ जिल्ह्यांतील सुमारे ९०० खेळाडूंनी नोंदणी केली असून एकूण १५०० ते २००० खेाडूंचा सहभाग अपेक्षित आहे.

या स्पर्धेसाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आमदार देवयानी फरांदे, क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, उपसंचालक स्नेहल साळुंखे, डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आयोजकांच्या वतीने राजेंद्र वानखेडे, सुनील फरांदे, नलिनी कड, डॉ. मुस्तफा टोपीवाला आदींनी क्रीडाप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळवून देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे,” असे आयोजकांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 8767550244 आणि 7083677721 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

“उत्साहाने धावा, अभिमानाने जिंका!” हे या स्पर्धेचे ब्रीदवाक्य ठरले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0