मुंबईत १८ एप्रिलला ‘नारी शक्ती फॉर विकसित भारत रन’; हजारो महिलांचा सहभाग अपेक्षित
मुंबईत १८ एप्रिल रोजी ‘नारी शक्ती फॉर विकसित भारत रन’चे आयोजन करण्यात येणार असून सुमारे ३,००० महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. देशभरातील सात शहरांमध्ये एकाच वेळी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मुंबई प्रतिनिधी - उदय कासारे
मुंबई, दि. १६ एप्रिल २०२६: भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या (MYAS) वतीने ‘नारी शक्ती फॉर विकसित भारत रन’ या विशेष उपक्रमाचे आयोजन मुंबईत शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी करण्यात येणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचा उत्सव म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात असून मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अमित पुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा उपक्रम देशातील सात प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळी राबविण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईसह बेंगळुरू, चेन्नई, कटक, दिल्ली, जयपूर आणि इंदौर या शहरांचा समावेश असून देशभरातून सुमारे ३५,००० महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.
मुंबईतील ही धाव बीकेसी परिसरातील Avenue 5 रोड, Parinee Crescenzo इमारतीजवळून सुरू होऊन धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलपर्यंत जाऊन पुन्हा प्रारंभ बिंदूपर्यंत परत येणार आहे. सुमारे २.२ किलोमीटर अंतराच्या या धावेत सुमारे ३,००० महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.
या कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच आमदार अमित साटम उपस्थित राहणार असून ते धावेला हिरवा झेंडा दाखवतील.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६:३० वाजता नोंदणी प्रक्रियेने होईल. त्यानंतर उद्घाटन, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि “नारी शक्ती” प्रतिज्ञा घेण्यात येईल. सकाळी ७:३० वाजता धावेला प्रारंभ होईल आणि शेवटी सहभागी महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
या उपक्रमात विद्यार्थीनी, महिला पत्रकार, स्वयंसेवी संस्था, उद्योजिका, क्रीडापटू तसेच विविध क्षेत्रांतील महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे. हा उपक्रम ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat), राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देणे आणि राष्ट्रनिर्मितीत त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0