नाशिकच्या भूमिका नेहेतेची आशियाई स्पर्धेत सुवर्ण झेप; 4x400 मीटर रिलेमध्ये भारताला सुवर्णपदक
हाँगकाँग, चीन येथे झालेल्या 22 व्या आशियाई 20 वर्षांखालील मैदानी अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या भूमिका नेहेते हिने भारताच्या 4x400 मीटर महिला रिले संघाकडून खेळत सुवर्णपदक जिंकले. भारताने 3 मिनिटे 38.7 सेकंद वेळ नोंदवत नवा विक्रमही प्रस्थापित केला.
नाशिक (ब्युरो) : हाँगकाँग, चीन येथे आयोजित 22 व्या आशियाई 20 वर्षांखालील (U-20) मैदानी अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या भूमिका नेहेते हिने दमदार कामगिरी करत भारताच्या महिला 4x400 मीटर रिले संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिच्या या यशामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिला 4x400 मीटर रिले स्पर्धेत भारताच्या संघाने उत्कृष्ट समन्वय आणि वेगाचे प्रदर्शन करत 3 मिनिटे 38.7 सेकंद वेळ नोंदवला. या कामगिरीसह भारताने सुवर्णपदक पटकावण्याबरोबरच नवीन विक्रमाचीही नोंद केली.
या रिले शर्यतीत भूमिका नेहेते हिने पहिली धावपटू म्हणून जबाबदारी पार पाडली. सुरुवातीपासूनच तिने आक्रमक आणि वेगवान धाव घेत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. तिच्या या भक्कम सुरुवातीमुळे संघाला सुवर्णपदकाचा पाया रचता आला.
भूमिकाची 200 मीटर धावण्याच्या प्रकारासाठीही भारतीय संघात निवड झाली होती. या स्पर्धेत तिने 24.13 सेकंद वेळ नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र केवळ एका शतांश सेकंदाच्या फरकाने तिला पदकापासून वंचित राहावे लागले आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
भूमिका नेहेते ही गेल्या आठ वर्षांपासून नाशिकमधील पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलात राष्ट्रीय एनआयएस प्रशिक्षक सिद्धार्थ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये तिने यापूर्वीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
प्रशिक्षक सिद्धार्थ वाघ यांनी भूमिकाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, या कामगिरीमुळे तिच्यासह भारतीय रिले संघाला आगामी जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात आशियाई स्पर्धा, जागतिक स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्येही नाशिकचे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाशिकमधील खेळाडूंनी यापूर्वी लांब पल्ल्याच्या शर्यतींमध्ये विशेष यश मिळवले होते. मात्र भूमिका नेहेतेच्या यशामुळे आता 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर आणि रिलेसारख्या वेगवान धावण्याच्या प्रकारांमध्येही नाशिकचे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, हे सिद्ध झाले आहे.
खेळाडूंच्या प्रगतीसाठी आवश्यक सुविधा इव्हान फाउंडेशनचे ऋषभ गोलिया यांच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याचेही सिद्धार्थ वाघ यांनी सांगितले. त्यामुळे खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक वातावरण मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भूमिकाच्या या सुवर्ण यशाबद्दल नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सुनील तावरगिरी, विभागीय क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंके, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0