सवतकडा धबधबा परिसरात एडव्हेंचर स्पोर्ट्सचा विस्तार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आधुनिक पर्यटन सुविधांचे लोकार्पण

कोल्हापूर जिल्ह्यातील सवतकडा धबधबा परिसरात झिप लाईन, साहसी खेळ, चिल्ड्रेन्स पार्क, सोव्हेनिअर शॉपसह विविध आधुनिक पर्यटन सुविधांचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

Jul 18, 2026 - 20:56
 0  7
सवतकडा धबधबा परिसरात एडव्हेंचर स्पोर्ट्सचा विस्तार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आधुनिक पर्यटन सुविधांचे लोकार्पण
सवतकडा धबधबा, प्रकाश आबिटकर, कोल्हापूर पर्यटन, गारगोटी वनपरिक्षेत्र, एडव्हेंचर स्पोर्ट्स,

कोल्हापूर | प्रतिनिधी : उमेश जाधव 

कोल्हापूर वन विभागांतर्गत गारगोटी वनपरिक्षेत्रातील सवतकडा धबधबा परिसरात पर्यटन विकासाला नवी चालना देणाऱ्या विविध आधुनिक सुविधांचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शनिवारी (दि. १८) करण्यात आले. वनपर्यटन राज्य योजना आणि स्टेट इको-टुरिझम योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या सुविधांमुळे सवतकडा परिसर साहसी आणि निसर्ग पर्यटनाचे आकर्षण ठरणार आहे.

यावेळी पर्यटकांसाठी झिप लाईन, विविध एडव्हेंचर स्पोर्ट्स, चिल्ड्रेन्स पार्क, सोव्हेनिअर शॉप तसेच अन्य पर्यटन सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. या आधुनिक उपक्रमांमुळे पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणासोबत साहसी पर्यटनाचाही आनंद घेता येणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, एक वर्षापूर्वी सवतकडा येथील सात धबधब्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. एकाच ठिकाणी सात धबधबे असलेले हे राज्यातील दुर्मीळ पर्यटनस्थळ असून, गेल्या वर्षभरात पर्यटकांनी या स्थळाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अल्पावधीतच सवतकडा परिसर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे.

ते पुढे म्हणाले की, पर्यटनाला नवा आयाम देण्यासाठी वन विभागाने दर्जेदार आणि सुरक्षित झिप लाईन, मुलांसाठी चिल्ड्रेन्स पार्क तसेच विविध साहसी खेळांची सुविधा विकसित केली आहे. त्यामुळे पर्यटकांना सात धबधब्यांच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेताना कुटुंबासह दिवसभर पर्यटनाचा अनुभव घेता येणार आहे. या सुविधांमुळे सवतकडा परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

यापूर्वी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते तिरवडे येथील कडगाव वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरातील कॅम्प ऑफिसच्या नूतनीकरण केलेल्या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कॅम्प ऑफिस परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

या कार्यक्रमास मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, डीवायएसपी विक्रम पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबा नांदेकर, उपसभापती अरुणा प्रशांत देसाई, सहाय्यक वनसंरक्षक वि. र. काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. जी. तायनाक, आर. डी. चौगुले, संचालक संदीप वरंडेकर, सरपंच सर्जेराव पाटील, भगवान पाटील, बापू दबडे, शहाजी देसाई, दिगंबर पाटील, बाजीराव सुतार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0