शेंडा पार्क रुग्णालय बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; दर्जात तडजोड होणार नाही – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूरच्या शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या ११०० खाटांच्या वैद्यकीय संकुलाच्या बांधकामाची IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट केली जाणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. दर्जेदार काम पूर्ण झाल्यानंतरच कंत्राटदाराला अंतिम बिल अदा केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Jul 11, 2026 - 21:33
 0  3
शेंडा पार्क रुग्णालय बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; दर्जात तडजोड होणार नाही – मंत्री हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ, शेंडा पार्क, कोल्हापूर, IIT ऑडिट, थर्ड पार्टी ऑडिट,

कोल्हापूर | प्रतिनिधी : उमेश जाधव 

कोल्हापूरच्या शेंडा पार्क येथे उभारण्यात येत असलेल्या ११०० खाटांच्या अत्याधुनिक वैद्यकीय संकुलाच्या बांधकामाची IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असून, गुणवत्ता प्रमाणित झाल्यानंतरच कंत्राटदाराला अंतिम बिल अदा केले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या बांधकामात त्रुटी असल्याच्या काही माध्यमांतील वृत्तांच्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी शनिवारी प्रत्यक्ष बांधकामस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसह संबंधित कंत्राटदारांकडून सविस्तर माहिती घेतली.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की, केंद्र सरकारची हॉस्पिटल प्रकल्प उभारणीत अनुभवी असलेली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी (PMC) कंपनी या प्रकल्पाचे व्यवस्थापन करत आहे. तसेच सर्व बांधकामाचे डिझाइन आणि तांत्रिक मार्गदर्शन IIT कडून करण्यात येत असून त्यानुसारच काम सुरू आहे.

ते म्हणाले की, सध्या कार्यरत असलेल्या कंपनीने देशभरात २०० हून अधिक रुग्णालये उभारली आहेत. तर बांधकाम करणारी NCC (नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी) ही देशातील अग्रगण्य कंपनी असून विमानतळ, पूल, महामार्ग, रुग्णालये आणि बहुमजली इमारतींसह अनेक मोठे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. त्यामुळे शेंडा पार्कमधील प्रकल्पही उच्च दर्जाचा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"बांधकामात कोणतीही त्रुटी किंवा उणीव आढळल्यास IIT चे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय संबंधित कंत्राटदाराला कोणतेही बिल अदा केले जाणार नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पात ६०० खाटांचे जनरल हॉस्पिटल, २५० खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जात आहे. या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात किडनी, लिव्हर आणि हृदय प्रत्यारोपणासारख्या अत्याधुनिक शस्त्रक्रियांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असतील.

तसेच कॅन्सर रुग्णालयात नवी मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या धर्तीवर उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून, त्याचा लाभ पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यातील रुग्णांनाही होणार आहे.

मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, ३१ मार्च २०२७ पर्यंत तिन्ही रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण करून त्यांचे लोकार्पण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. लाखो गरीब रुग्णांना आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, माध्यमांनी बांधकामातील संभाव्य त्रुटी निदर्शनास आणून दिल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, डॉ. गिरीश कांबळे तसेच संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.