बकरी ईदसाठी देवनार पशुवधगृह सज्ज; सुरक्षा, स्वच्छता व नागरिक सुविधांची व्यापक तयारी
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर देवनार पशुवधगृह येथे सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, सीसीटीव्ही निगराणी आणि नागरिक सुविधांची व्यापक तयारी सुरू केली आहे. १७ ते ३० मे २०२६ दरम्यान येथे प्राण्यांचा बाजार भरणार असून २४ तास नियंत्रण कक्षही कार्यरत राहणार आहे.
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर देवनार पशुवधगृह येथे विविध सोयीसुविधांची व्यापक तयारी सुरू केली आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, दिनांक १७ ते ३० मे २०२६ दरम्यान देवनार पशुवधगृह येथे म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे.
यंदा बकरी ईद २८ मे २०२६ रोजी साजरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेची विशेष तयारी केली आहे. देवनार परिसरात सीसीटीव्हीद्वारे निगराणी, सुरक्षारक्षकांची नियुक्ती, वाहनतळ, उपाहारगृह, तक्रार निवारण कक्ष तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार विविध विभागांच्या समन्वयातून पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. धार्मिक पशुवधासाठी मुंबईत एकूण १०९ ठिकाणी परवानगी देण्यात आली असून, परवानगी अर्जासाठी MyBMC मोबाईल अॅपवर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच पशू आयात परवाना आणि स्लॉट बुकिंगसाठी ऑनलाइन व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
नागरिकांच्या तक्रारींसाठी २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असून ९०७६०००४८१, ९०७६०००४८२, ९०७६०००४८३ आणि ९०७६०००४८४ हे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध राहतील.
देवनार पशुवधगृहात प्राण्यांसाठी मोठ्या प्रमाणात निवारा व्यवस्था, अतिरिक्त पाणीपुरवठा, आरोग्य केंद्रे, पशुवैद्यकीय सेवा आणि स्वच्छतेसाठी शेकडो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. परिसरात सुमारे ५०० पोलिस कर्मचारी, २०० सुरक्षारक्षक आणि ५५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे.
याशिवाय, क्यूआर कोड आधारित तपासणी, अग्निशमन सुविधा, सार्वजनिक शौचालये, स्नानगृहे, पावसाळी निचरा व्यवस्था आणि तात्पुरत्या उपाहारगृहांची सोयही नागरिकांसाठी करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0