भटवाडीतील पदपथ अतिक्रमणमुक्त; अनधिकृत स्टॉल्स व शेडवर महापालिकेची धडक कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागाने घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी परिसरात पदपथांवरील अनधिकृत स्टॉल्स, लोखंडी शेड आणि तात्पुरती अतिक्रमणे हटवून व्यापक कारवाई केली. या कारवाईमुळे राम जोशी मार्ग व आर. बी. कदम मार्गावरील पदपथ नागरिकांसाठी मोकळे झाले आहेत.
संतोष पांडे | घाटकोपर प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी शहरातील सुमारे ३२० किलोमीटर लांबीच्या पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेच्या एन विभागाने घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी परिसरात मोठी अतिक्रमण हटाव कारवाई केली. राम जोशी मार्ग आणि आर. बी. कदम मार्गावरील पदपथांवर उभारण्यात आलेले अनधिकृत स्टॉल्स, लोखंडी शेड तसेच तात्पुरत्या स्वरूपातील विविध अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली.
या धडक कारवाईमुळे अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले पदपथ पुन्हा नागरिकांसाठी खुले आणि मोकळे झाले आहेत. पदपथांवरील अडथळे दूर झाल्याने पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालणे शक्य होणार असून परिसरातील वाहतूक व्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपआयुक्त संतोषकुमार धोंडे आणि सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता भरत केदार यांच्या नेतृत्वात ही व्यापक कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान पदपथांवर उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे, स्टॉल्स, बाकडे, लोखंडी संरचना आणि शेड हटविण्यात आले. महापालिकेच्या पथकाने संपूर्ण परिसराची पाहणी करून पदपथांवरील अतिक्रमणे दूर करत मार्ग नागरिकांसाठी मोकळा केला.
भटवाडी परिसरात शाळा, विविध व्यावसायिक आस्थापने आणि दाट लोकवस्ती असल्याने या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. मात्र, पदपथांवर झालेल्या अतिक्रमणामुळे विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि इतर पादचाऱ्यांना अनेकदा पदपथ सोडून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढण्याबरोबरच वाहतुकीच्या कोंडीतही भर पडत होती.
या समस्येबाबत स्थानिक नागरिकांकडून महापालिकेकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत एन विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने ही व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. कारवाईदरम्यान संबंधित अनधिकृत संरचना हटवून पदपथावरील अडथळे दूर करण्यात आले.
महापालिकेच्या या कारवाईमुळे पदपथ पुन्हा नागरिकांसाठी खुले झाले असून पादचाऱ्यांना सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध झाला आहे. अतिक्रमण हटवल्याने रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार असून परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या या धडक कारवाईबद्दल भटवाडी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पदपथांवरील अतिक्रमणे पुन्हा होऊ नयेत यासाठी नियमित पाहणी करण्यात यावी आणि अशा अतिक्रमण हटाव मोहिमा सातत्याने राबविण्यात याव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0