मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवा अधिक नागरिकाभिमुख करण्याचे निर्देश; ट्रॉमा केअर रुग्णालयाची अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांची पाहणी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी परवाना प्रक्रिया, नागरिक सुविधा केंद्रे, ऑनलाइन आरोग्य सेवा आणि दफनभूमींच्या स्वच्छतेबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
मुंबई प्रतिनिधी | देवानंद शिंदे
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयाला भेट देऊन आरोग्यविषयक सुविधा, रुग्णसेवा आणि प्रशासकीय कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आरोग्य सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
परवाना प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याचे निर्देश
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध परवान्यांच्या प्रक्रियेत संबंधित विभागांची जबाबदारी स्पष्ट असावी. सर्व नियमांचे काटेकोर पालन करत व्यवसाय सुलभतेला चालना मिळेल, यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, ऑनलाइन परवाना मंजुरी आणि डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नागरिक सुविधा केंद्रे अधिक सक्षम करण्यावर भर
आरोग्य सेवांसाठी नागरिक सुविधा केंद्रे (CFC) ही महत्त्वाची संपर्क यंत्रणा असल्याचे सांगत त्यांनी ही केंद्रे अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले. आरोग्य सेवांसाठी स्वतंत्र सेवा कक्ष, अर्जांच्या स्थितीचा ऑनलाइन मागोवा, प्रमाणित अर्ज नमुने नागरिकांना सहज दिसतील अशा ठिकाणी प्रदर्शित करणे आणि शक्य तितक्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यास सांगितले.
मानवी हस्तक्षेप कमी, डिजिटल सेवांना प्राधान्य
आरोग्यविषयक सेवांमध्ये मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून डिजिटल आणि ऑनलाइन प्रणालीद्वारे जलद, पारदर्शक व कार्यक्षम सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
दफनभूमींच्या स्वच्छतेचा आढावा
यावेळी महानगरपालिका हद्दीतील दफनभूमींची स्वच्छता, देखभाल आणि आवश्यक नागरी सुविधा यांचाही आढावा घेण्यात आला. संबंधित यंत्रणांनी आवश्यक नियोजन करून दफनभूमींची स्वच्छता व सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले.
बैठकीला उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उप आयुक्त (परिमंडळ-४) भाग्यश्री कापसे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, परिमंडळ-४ मधील सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त तसेच आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता, डिजिटलायझेशन आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धती वाढवून सेवा वितरण अधिक प्रभावी करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1