चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचावा आणि चोंडी गावाचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली आहेत. दर्जेदार सुविधा उभारून चोंडीला प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळ, चोंडी येथील जतन, संवर्धन व विकास आराखड्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, नियोजन विभागाच्या शैला ए, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, चोंडी येथील स्मृतिस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी ६८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत भव्य पुतळा, सुशोभित उद्यान, नदीकाठाचा विकास, आधुनिक संग्रहालय, ओपन एअर थिएटर तसेच पर्यटन सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहेत.
स्मारक परिसरात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता करण्यासाठी जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच हरित क्षेत्र आणि मोकळ्या जागांचा समतोल राखत परिसराचे सौंदर्यीकरण करण्यावरही भर देण्यात आला.
बुडीत बंधाऱ्यांऐवजी बॅरेज उभारण्याबाबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. मंदिर परिसरातील भूसंपादन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करावे, असेही निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
प्रकल्पातील काही सुविधा उभारणी व देखभालीसाठी खासगी भागीदारी (PPP मॉडेल) राबविण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून, यामुळे पर्यटन सुविधा अधिक दर्जेदार, कार्यक्षम आणि दीर्घकालीन टिकाऊ पद्धतीने विकसित होतील, असे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ३६० कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पातील दोन कामांसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक जागेच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी संबंधित विभागांनी संयुक्त मोजणी पूर्ण केली आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, चोंडी विकास आराखड्यात इतिहास, संस्कृती आणि पर्यटन यांचा समन्वय साधत स्थानिक विकास व रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा शासनाचा मानस आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

