ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला.

May 18, 2026 - 15:28
 0  4
ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान
धोंडीराम सायकर, तबलावादक सन्मान, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, रवि लांडगे,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. १५ मे २०२६ :

पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

महापालिकेने शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याचे धोरण निश्चित केले असून त्यानुसार हा सन्मान सोहळा पार पडला.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, माजी महापौर तथा नगरसदस्या अपर्णा डोके, नगरसदस्या मनिषा चिंचवडे, नगरसदस्य अनंत कोऱ्हाळे, सुरेश भोईर तसेच उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

तसेच धोंडीराम सायकर यांचे पुत्र नरेंद्र सायकर, निलेश सायकर आणि नातू साहिल सायकर हे देखील यावेळी उपस्थित होते. मानपत्राचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

धोंडीराम सायकर यांनी आपल्या तबल्याच्या तालातून शहराच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध अधिष्ठान दिले आहे. बालवयापासून संगीत साधनेशी त्यांचे नाते जुळले असून त्यांनी अनेक नामवंत गायक आणि कलावंतांच्या मैफिली आपल्या प्रभावी तबलावादनातून संस्मरणीय केल्या आहेत.

भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा जपत त्यांनी विविध व्यासपीठांवर तबल्याची उत्कृष्ट साथसंगत केली आहे. नवोदित कलाकारांना मार्गदर्शन, संगीत स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून योगदान तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांनी शहराच्या सांस्कृतिक वातावरणाला समृद्ध केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0