शेतकऱ्याने केवळ उत्पादक न राहता प्रक्रियादार व निर्यातदार व्हावे – पणन मंत्री जयकुमार रावल
शेतकऱ्यांनी केवळ शेतमाल उत्पादक न राहता प्रक्रियादार, ब्रँड अॅम्बेसेडर आणि निर्यातदार व्हावे, यासाठी शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी जयसिंगपूर येथे सांगितले.
प्रतिनिधी : उमेश जाधव
कोल्हापूर, दि. २२ (जिमाका) : शेतकऱ्यांनी केवळ शेतमालाचे उत्पादक न राहता प्रक्रियादार, ब्रँड अॅम्बेसेडर आणि निर्यातदार बनण्याची गरज आहे. शेतमालाला अधिक मूल्य मिळवून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून खासगी कंपन्या, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गटांची स्थापना करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या उपक्रमांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन इमारतीच्या प्लिंथ काँक्रिटीकरण कामाचा तसेच व्यापारी गाळे बांधकामाच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅब कामाचा शुभारंभ मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोकराव माने, जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, रजनीताई मगदूम, सावकर मादनाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चव्हाण, उपसभापती माधुरी सावगावे, माजी सभापती सुभाषसिंह रजपूत, सचिव सुनील गावडे यांच्यासह बाजार समितीचे सभासद, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
कृषी मूल्यसाखळी विकसित करण्यावर भर
मंत्री रावल म्हणाले की, शेतीमालावर आधारित पिकांची संपूर्ण मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आशियाई बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) या योजनेअंतर्गत मोठे प्रकल्प सुरू करण्यात येत असून, यासाठी जवळपास २ हजार ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
शिरोळसारख्या प्रगतशील तालुक्यातही या योजनेअंतर्गत प्रकल्प सुरू झाले पाहिजेत. त्यासाठी संबंधितांनी पुढाकार घेऊन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
काढणीनंतरच्या प्रक्रिया सुविधांना शासनाची मदत
शेतमालाची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाते. फळे आणि भाजीपाल्यासाठी काढणीनंतरच्या सुविधा, प्रक्रिया केंद्रे, साठवणूक व्यवस्था आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सहाय्य केले जाते.
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने यासाठी ठोस प्रस्ताव तयार करावा. तसेच आधुनिक कोल्ड चेन, ग्रेडिंग-पॅकिंग सुविधा, ई-लिलाव व्यवस्था आणि डिजिटल बाजारभावाची माहिती उपलब्ध करून देणारे प्रकल्प बाजार समिती, शेतकरी उत्पादक कंपनी, उद्योजक किंवा स्वतः शेतकऱ्यांनी पणन विभागाकडे सादर करावेत. अशा प्रस्तावांना शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाकडून विविध महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत असल्याचेही मंत्री रावल यांनी सांगितले. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, मोफत वीज, किसान क्रेडिट कार्ड, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना, कृषी पायाभूत सुविधा योजना आणि ई-नाम यांसारख्या योजनांचा समावेश आहे.
या योजनांचा शेतकऱ्यांनी प्रभावीपणे लाभ घेऊन आधुनिक शेती, प्रक्रिया आणि बाजारपेठेशी जोडले जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जागतिक बाजारपेठेशी शेतकऱ्यांना जोडणार
पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराजवळ जवळपास १,३०० एकर क्षेत्रावर जगातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजारपेठांपैकी एक अत्याधुनिक जागतिक बाजार उभारण्याचे नियोजन असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.
या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन, प्रक्रिया, साठवणूक आणि जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव
यावेळी जयकुमार रावल यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा गौरव केला. शिक्षण, आरक्षण, सहकार, सिंचन, उद्योग आणि शेतकरी कल्याणासाठी शाहू महाराजांनी केलेल्या कार्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला कृषी क्षेत्रात विशेष स्थान मिळाले आहे.
कोल्हापूर जिल्हा ऊस, गूळ, दूध आणि भाजीपाला यांसारख्या कृषीपूरक व्यवसायांमध्ये महाराष्ट्रात आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि बाजार समितीचे माजी अध्यक्ष सुभाषसिंह रजपूत यांनी मनोगत व्यक्त करून जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींच्या मागण्या मांडल्या.