मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे यकृत प्रत्यारोपण शक्य; पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या २१.६० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीमुळे अकोल्यातील प्रशांत इंगळे यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. पत्नी वर्षा इंगळे यांनी यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले.
नाशिक ब्यूरो :
मुंबई, दि. ४ : आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा लाखो रुपयांचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. मात्र, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले.
प्रशांत इंगळे यांच्या उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांच्या खर्चाची आवश्यकता होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी २ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून १९ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध झाली.
या दोन्ही माध्यमांतून एकूण २१ लाख ६० हजार रुपयांचा निधी उभारण्यात आला. त्यामुळे अत्यंत खर्चिक असलेली यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आणि इंगळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
केबल टाकण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह
प्रशांत इंगळे हे अकोला येथे केबल टाकण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी, महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ दरम्यान त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अकोला आणि नागपूर येथे करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासण्यांनंतर त्यांचे यकृत गंभीररीत्या निकामी होत असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. मात्र, उपचारासाठी लागणारा लाखो रुपयांचा खर्च कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेबाहेर असल्याने इंगळे कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळाला आधार
या कठीण परिस्थितीत प्रशांत इंगळे यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी कुटुंबीयांसह अकोल्याच्या आमदारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती देण्यात आली आणि पुढील उपचारासाठी मुंबईत जाण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानंतर इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. नाईक यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच टाटा ट्रस्टकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रभावी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला.
पत्नीच्या यकृतदानातून पतीला नवजीवन
आर्थिक मदत उपलब्ध झाल्यानंतर २५ जून २०२६ रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात प्रशांत इंगळे यांच्यावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या शस्त्रक्रियेत पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीच्या उपचारात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
शस्त्रक्रियेनंतर प्रशांत इंगळे यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली. त्यामुळे १३ जुलै २०२६ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू पूर्णपणे बरे होत आहेत.
वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे आपल्याला नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त करत इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसेच टाटा ट्रस्ट यांचे मनःपूर्वक आभार मानले.
प्रतिक्रिया
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचार पैशांअभावी थांबू नये, या उद्देशाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. त्याच भावनेतून प्रशांत इंगळे यांना वेळेत आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून देता आली, याचा आम्हाला आनंद आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.”
– रामेश्वर नाईक
कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष