एनसीसी भवनमध्ये संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न; ३५० कॅडेट्सचा सहभाग

राष्ट्रीय छात्रसेना (NCC) अंतर्गत CATC 304 संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर कोल्हापूर येथील एनसीसी भवनमध्ये उत्साहात पार पडले. दहा दिवस चाललेल्या या शिबिरात ३५० कॅडेट्सनी सहभाग घेत विविध लष्करी, शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणांचा लाभ घेतला.

May 20, 2026 - 23:11
 0  3
एनसीसी भवनमध्ये संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न; ३५० कॅडेट्सचा सहभाग
एनसीसी भवनमध्ये संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर

कोल्हापूर : राष्ट्रीय छात्रसेना (NCC) अंतर्गत संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर – CATC 304 हे ११ ते २० मे या कालावधीत एनसीसी भवन, कोल्हापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, एनसीसी, कोल्हापूर यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या दहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात एकूण ३५० कॅडेट्सनी सहभाग घेत विविध प्रशिक्षण उपक्रमांचा लाभ घेतला.

शिबिरादरम्यान कॅडेट्सना ड्रिल, शस्त्र हाताळणी, फायरिंग, नकाशा वाचन, प्राथमिक उपचार तसेच शारीरिक तंदुरुस्ती यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

याशिवाय राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण, वाहतूक नियमांचे पालन, भारतीय सैन्य दलातील करिअर संधी आणि व्यक्तिमत्व विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.

कॅडेट्सनी शिबिरादरम्यान स्वच्छ भारत अभियान आणि महिला सक्षमीकरण विषयांवर जनजागृती उपक्रमही राबवले. सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासोबतच राष्ट्रसेवेची भावना दृढ करण्यावर या उपक्रमांमधून भर देण्यात आला.

या शिबिरामुळे कॅडेट्समध्ये आत्मविश्वास, शारीरिक क्षमता, शिस्त, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची भावना अधिक बळकट झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

शिबिराचे आयोजन कर्नल विक्रम एस. नलवडे, कमांडिंग ऑफिसर, ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, एनसीसी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी एनसीसी अधिकारी, सहायक एनसीसी अधिकारी आणि प्रशिक्षक वर्ग यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0