पन्हाळगड परिसरात १० मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू; अतिक्रमण हटविण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क

पन्हाळा येथील सादोबा दर्गा परिसरातील कथित अनधिकृत अतिक्रमण हटविण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १० मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांच्या जमावबंदीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

May 8, 2026 - 20:30
 0  4
पन्हाळगड परिसरात १० मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू; अतिक्रमण हटविण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क
पन्हाळगड आदेश, कोल्हापूर न्यूज, सादोबा दर्गा,

पन्हाळा येथील हजरत पीर शहादुद्दीन खतावली दर्गा (सादोबा दर्गा) परिसरातील कथित अनधिकृत अतिक्रमण हटविण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पन्हाळगड व परिसरात १० मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सादोबा दर्गा समोरील तलावाशेजारी असलेले बांधकाम अनधिकृत अतिक्रमण असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. संबंधित ट्रस्टींना हे बांधकाम स्वतःहून हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून, मुदतीत कारवाई न झाल्यास ९ मे रोजी प्रशासनाकडून अतिक्रमण निष्कासन मोहीम राबविण्यात येणार आहे.

या कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गजानन गुरव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

आदेशानुसार ८ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १० मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला वाहने पार्क न करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.

प्रशासनाच्या माहितीनुसार, अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी येण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.

दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0