रक्षक चौक भुयारी मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; वाहनचालकांनी वेगमर्यादा आणि नियमांचे पालन करावे – महापालिकेचे आवाहन

पिंपरी-चिंचवडमधील रक्षक चौक येथे उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या असून वाहनचालकांनी ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे महापालिकेने आवाहन केले आहे.

May 27, 2026 - 04:26
 0  3
रक्षक चौक भुयारी मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; वाहनचालकांनी वेगमर्यादा आणि नियमांचे पालन करावे – महापालिकेचे आवाहन
रक्षक चौक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, भुयारी मार्ग

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. २६ मे २०२६ : सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथे उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पातील सर्व सुरक्षा निकष पूर्ण करण्यात आले असून वाहनचालकांनी वेगमर्यादा आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आहे.

महापालिकेकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेमार्फत सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच वाहतूक सुरक्षिततेचा व्यापक आढावा घेण्यासाठी वाहतूक मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नोंदणीकृत सुरक्षा लेखापरीक्षण संस्थेचीही नियुक्ती करण्यात आली होती.

सल्लागार संस्थेने प्रत्यक्ष पाहणी, सर्वेक्षण आणि अभ्यास केल्यानंतर भुयारी मार्ग आणि जोडरस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यानुसार भुयारी मार्ग आणि दोन्ही बाजूंच्या उतार रस्त्यांवर वाहनांना एकमेकांना ओलांडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

तसेच इंडियन रोड काँग्रेस (IRC) मानकांनुसार ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा दर्शविणारे अनिवार्य फलक बसविण्यात आले आहेत.

भुयारी मार्ग आणि रॅम्पवर संथ गतीची वाहने, सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून त्यांच्यासाठी स्वतंत्र समतल सेवा रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हा मार्ग केवळ मोटार वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (BRTS) साठी देखील स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली असून त्यासाठीही ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे.

वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उतार रस्त्यांवर भारतीय मानांकनानुसार आडव्या पट्ट्यांचे चिन्हांकन करण्यात आले आहे. तसेच धोकादायक ठिकाणी आणि रस्ते एकत्र येणाऱ्या भागांमध्ये वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे पिवळ्या रंगाचे इशारा दिवे बसविण्यात आले आहेत.

रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढावी यासाठी संरक्षक कठड्यांवर प्रकाश परावर्तित करणारे मध्यदर्शक बसविण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले, “रक्षक चौक भुयारी मार्गाच्या दोन्ही रॅम्पसंदर्भातील सर्व सुरक्षा बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादेचे पालन करावे आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत.”

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले की, “रक्षक चौक येथील भुयारी मार्गामुळे भविष्यात वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुरळीत होणार आहे. नागरिकांनी बीआरटीएस मार्गिकांमध्ये खासगी वाहनांचा प्रवेश टाळावा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.”

महापालिकेने नागरिकांना सुरक्षित आणि जबाबदारीने वाहन चालविण्याचे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.