सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रस्तावित कॉरिडॉरला विरोध; स्थानिकांशी संवादानंतरच निर्णय – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रस्तावित कॉरिडॉरला कोल्हापूरमध्ये तीव्र विरोध होत असून, स्थानिकांशी संवाद साधूनच निर्णय घ्यावा, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी निर्देश दिले.
कोल्हापूर, दि. ०४ : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत प्रस्तावित नवीन व्याघ्र मार्गिका (कॉरिडॉर) संदर्भात स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता निर्णय घेणे अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करत, या विषयावर स्थानिकांशी संवाद साधूनच पुढील निर्णय घ्यावेत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावामुळे कोल्हापूरसह लगतच्या जिल्ह्यांतील सुमारे ५५० हून अधिक गावांवर विविध निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच वन्यप्राण्यांच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडणार आहे.
वन विभागाने तातडीने स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींची मते जाणून घेऊन ती राज्य व केंद्र शासनाला कळवावीत, असे निर्देश देताना पालकमंत्री आबिटकर यांनी हा प्रस्ताव मान्य नसल्याची भूमिका मांडली. यासंदर्भात मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्याकडेही मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार शिवाजी पाटील यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खासदार शाहू छत्रपती यांनी या प्रकल्पामुळे नागरिकांच्या हक्कांवर गदा येण्याची भीती व्यक्त केली. खासदार धैर्यशील माने यांनी प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींवर प्रश्न उपस्थित करत प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करण्याची गरज अधोरेखित केली.
आमदार विनय कोरे यांनी या विषयावर ठराव घेऊन संबंधित विभागाकडे पाठवण्याची गरज व्यक्त केली, तर आमदार शिवाजी पाटील यांनी माहिती गुप्त ठेवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले.
कोणताही विकास प्रकल्प राबविताना पारदर्शकता राखणे आणि स्थानिकांना प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी नमूद केले. सहअस्तित्वाचा विचार करतच पुढील निर्णय घेण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0