पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणीसह ५ हजार रक्तदानाचे लक्ष्य
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या महाबैठकीत पदवीधर मतदार नोंदणी मोहीम आणि रक्तदान अभियानाला गती देण्याचा निर्धार करण्यात आला. शहरात ७५ हजार पदवीधर मतदार नोंदणी आणि ५ हजार रक्तदानाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड, दि. १९ जुलै : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरातील कासारवाडी येथील हॉटेल कलासागरमध्ये रविवारी भाजपा पदाधिकाऱ्यांची महाबैठक पार पडली. या बैठकीत आगामी संघटनात्मक कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला असून, पदवीधर मतदार नोंदणी मोहीम आणि रक्तदान अभियान युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पिंपरी-चिंचवड शहरात ७५ हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती दिली. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने किमान ५०० पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे त्यांनी स्पष्ट केले. नोंदणीसोबत आवश्यक कागदपत्रांच्या हार्ड कॉपी वेळेत कार्यालयात जमा करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
या मोहिमेच्या प्रगतीवर दररोज लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र आढावा पत्रक (चार्ट) तयार करून जिल्हाध्यक्ष आणि गटनेत्यांकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. २० ऑगस्टपर्यंत ही मोहीम शंभर टक्के पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, या कामगिरीचा भविष्यातील पक्षपदांच्या वाटपातही विचार केला जाईल, असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
रक्तदान मोहिमेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरासाठी ५ हजार रक्तदानाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त मोठे फलक आणि जाहिरातबाजी करण्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम म्हणून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनीही संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. बीएलए-२चे काम पूर्ण झाले असले तरी मतदार मॅपिंगचे काम अधिक वेगाने पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील १८ दिवसांत प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घेत शहरातील पदवीधर मतदार नोंदणी मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या महाबैठकीला भाजपा प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार महेशदादा लांडगे, उमाताई खापरे, शंकरशेठ जगताप, अमित गोरखे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडे, पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, पदवीधर नोंदणी प्रमुख राजेश पिल्ले, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांच्यासह सर्व नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, मंडलाध्यक्ष, मोर्चा व प्रकोष्ठ प्रमुख, तिन्ही विधानसभा मतदारसंघांचे बीएलए-१ आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
महाबैठकीचे प्रास्ताविक शत्रुघ्न काटे यांनी केले. सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे यांनी केले, तर विकास डोळस यांनी उपस्थितांचे आभार मानले. आगामी संघटनात्मक उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0