विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणावर भर; शासकीय शाळांचा दादाजी भुसे यांनी घेतला सर्वंकष आढावा

महाराष्ट्रातील जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, सैनिकी शाळा, शासकीय विद्यानिकेतन आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सर्वंकष आढावा घेतला.

Jul 29, 2026 - 21:06
 0  8
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणावर भर; शासकीय शाळांचा दादाजी भुसे यांनी घेतला सर्वंकष आढावा
दादाजी भुसे, शालेय शिक्षण विभाग, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शासकीय शाळा

मुंबई प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मुंबई, दि. 29 : शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, सैनिकी शाळा, शासकीय विद्यानिकेतन आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे, उपलब्ध सोयी-सुविधा, विद्यार्थ्यांची प्रवेशस्थिती, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी आणि शैक्षणिक मूल्यमापन यासह विविध बाबींचा मंत्री भुसे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत सविस्तर आढावा घेतला.

बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक, विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य आणि कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत शिक्षक, अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदांची संख्या, कार्यरत कर्मचारी आणि रिक्त पदांची स्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध शैक्षणिक संस्थांच्या इमारतींची सद्यस्थिती, पायाभूत सुविधा, शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाचा वापर, झालेला खर्च आणि शिल्लक निधी याचाही आढावा घेण्यात आला.

तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची सद्यस्थिती, अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रिया आणि विविध शासकीय योजनांच्या प्रगतीची माहिती मंत्री भुसे यांनी घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह संस्थांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक बाबी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ज्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय विद्यालय उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात यावेत, असे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले. तसेच सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांना परिसरातील इतर शाळांमधून प्राथमिक प्रशिक्षण देण्याबाबत आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

शासकीय विद्यानिकेतनमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेबाबत जनजागृती करणे, उपलब्ध शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करणे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू असलेल्या पायाभूत सुविधा आणि सोयी-सुविधांच्या कामांना अधिक गती देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

विद्यार्थीहित, शैक्षणिक गुणवत्ता आणि शैक्षणिक संस्थांचा सर्वांगीण विकास यांना प्राधान्य देत शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी संबंधित अधिकारी आणि संस्थांच्या प्रमुखांना केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.