२१ जुलैला आझाद मैदानावर किसान सभेचा भव्य शेतकरी मोर्चा; कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकरी एकवटणार

नियमित कर्जदारांना दोन लाखांपर्यंत दिलासा, देवस्थान व गायरान जमिनी शेतकरी-श्रमिकांच्या नावे करणे, पीक विमा योजना शेतकरी हिताची करणे, अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाई आणि पेसा कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवण्याच्या मागण्यांसाठी २१ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे किसान सभेच्या वतीने भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे.

२१ जुलैला आझाद मैदानावर किसान सभेचा भव्य शेतकरी मोर्चा; कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकरी एकवटणार
किसान सभा, शेतकरी मोर्चा, आझाद मैदान, मुंबई, शेतकरी आंदोलन

नाशिक ब्यूरो 

मुंबई, दि. १९ : विविध प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या वतीने सोमवार, २१ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील २१ हून अधिक जिल्ह्यांतील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या मोर्चाद्वारे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत दिलासा, देवस्थान, गायरान आणि घराच्या तळजमिनी शेतकरी व श्रमिकांच्या नावे करणे, पीक विमा योजनेतील ट्रिगर प्रणाली पूर्ववत करून योजना शेतकरी हिताची बनविणे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देणे तसेच पेसा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया त्वरित थांबविणे या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.

मोर्चाचे नेतृत्व डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले आणि उमेश देशमुख करणार आहेत. राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर आणि किसान सभेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याने आझाद मैदान परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

किसान सभेने राज्य शासनाने शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी समाजाच्या विविध मागण्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.