राज्यात पुन्हा ‘वॉटर कप’ स्पर्धेचा जल्लोष! २० हजार गावांचा सहभाग अपेक्षित; ८० हजार नागरिकांना मिळणार प्रशिक्षण
महाराष्ट्रात जलसंधारणाला लोकसहभागाची जोड देण्यासाठी पुन्हा वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. २० हजार गावांचा सहभाग आणि ८० हजार नागरिकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री संजय राठोड यांची माहिती.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार; जानेवारी ते मार्च २०२७ प्रशिक्षण, एप्रिल-मे महिन्यात स्पर्धेचे आयोजन; आमिर खान यांचे सामूहिक सहभागाचे आवाहन
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि अल्-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘वॉटर कप’ स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावागावांत जलसंधारणाची लोकचळवळ उभी करून महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे २० हजार गावांचा सहभाग अपेक्षित असून, तब्बल ८० हजार नागरिकांना जलसंधारणाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या या अभियानात पाणी फाउंडेशनसह शासनाचे विविध विभाग, ग्रामपंचायती, सरपंच, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत. यंदाच्या अभियानात ग्रामीण भागासोबतच नगरपंचायती आणि लहान नगरपरिषदांचाही सहभाग घेण्याबाबत शासन सकारात्मक असून, त्यासाठी नगरविकास विभागाशी चर्चा करून स्वतंत्र निकष निश्चित करण्यात येणार आहेत.
नगरपंचायत आणि लहान नगरपरिषदांचाही समावेश
वॉटर कप अभियान हे केवळ ग्रामीण भागापुरते मर्यादित न ठेवता नगरपंचायती आणि लहान नगरपरिषदांनाही त्यात सहभागी करून घेण्याचा शासनाचा विचार आहे. यासाठी नगरविकास विभागाशी चर्चा करून त्यांच्या सहभागासाठी स्वतंत्र निकष तयार करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पाणी फाउंडेशनची टीम, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, तालुकास्तरीय यंत्रणा, सरपंच आणि ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. लोकसहभागातून गावांना जलसमृद्ध करण्यासाठी सर्वांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
लोकसहभागातून २० हजार गावांत जलसंधारणाची चळवळ – मंत्री संजय राठोड
राज्यात जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देऊन गावागावांत पाणी बचतीची आणि जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
राज्यात यापूर्वी २०१६ ते २०१९ या कालावधीत ७६ तालुक्यांमध्ये वॉटर कप स्पर्धा राबविण्यात आली होती. या स्पर्धेला गावांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर पाणी फाउंडेशनने फार्मर कप स्पर्धा सुरू केली. मात्र, यंदा अल्-निनो आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा वॉटर कप स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्पर्धेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच जलद गतीने निर्णय घेण्यासाठी प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे.
या स्पर्धेत प्रत्येक गावातील किमान चार नागरिक किंवा स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार सुमारे ८० हजार नागरिक प्रशिक्षित होतील. पाणी फाउंडेशनने तयार केलेल्या मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
४० प्रशिक्षण केंद्रांवर प्रशिक्षण; एप्रिल-मे २०२७ मध्ये स्पर्धा
वॉटर कप स्पर्धेच्या तयारीसाठी राज्यातील ४० प्रशिक्षण केंद्रांवर १५ जानेवारी २०२७ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर एप्रिल आणि मे २०२७ या दोन महिन्यांत प्रत्यक्ष स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
या माध्यमातून गावपातळीवर जलसंधारणाच्या कामांना गती मिळणार असून, पाणी अडविणे, पाण्याचा योग्य वापर करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळणार आहे. लोकसहभागातून अधिकाधिक जलसंधारणाची कामे व्हावीत, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले.
सामूहिक प्रयत्नांतूनच परिवर्तनकारी परिणाम शक्य – आमिर खान
या अभियानात पाणी फाउंडेशनचे संस्थापक आणि अभिनेते आमिर खान यांनीही सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘जलयुक्त शिवार’ अभियानाच्या सुरुवातीच्या काळात राज्य शासनासोबत पाणी फाउंडेशननेही समांतरपणे काम केले होते. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या तीन वर्षांत ही चळवळ ७५ तालुक्यांपर्यंत पोहोचली, असे त्यांनी सांगितले.
प्रशासन, सामाजिक संस्था, पाणी फाउंडेशन, विविध भागीदार आणि स्वयंसेवक यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे प्रभावी आणि परिवर्तनकारी परिणाम साध्य झाले. सध्याची दुष्काळी परिस्थिती ही सर्वांसाठी आव्हानात्मक असून पाण्याचा परिणाम केवळ शेतीवरच नव्हे, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतो. शेतकरी असो किंवा समाजातील अन्य घटक, प्रत्येकाच्या जीवनाचा पाण्याशी थेट संबंध आहे, असे आमिर खान यांनी नमूद केले.
या आव्हानात्मक परिस्थितीकडे ऐतिहासिक काम करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या अभियानातून व्यापक लोकचळवळ उभी राहू शकते. त्यासाठी प्रत्येकाने पूर्ण ताकदीने, समर्पित भावनेने आणि एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. सामूहिक सहभागातून महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्याचे ऐतिहासिक उद्दिष्ट निश्चितच साध्य होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी लोकचळवळीची गरज
पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावागावांत जलसंधारणाची कामे, जनजागृती आणि सामूहिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे आगामी २०२७ मधील ही स्पर्धा महाराष्ट्राच्या जलसंधारण चळवळीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.