अॅडियन आणि युनिसेफच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळाची पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेला भेट; विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे केले कौतुक

अॅडियन आणि युनिसेफच्या नेदरलँड्स, अमेरिका व दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळाने पिंपळे गुरव येथील पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेला भेट देऊन डिजिटल शिक्षण, STEM प्रयोगशाळा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली.

अॅडियन आणि युनिसेफच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळाची पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेला भेट; विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे केले कौतुक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अॅडियन, युनिसेफ, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळ, पिंपळे गुरव शाळा, डिजिटल शिक्षण, STEM प्रयोगशाळा, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, महापालिका शाळा, शिक्षण उपक्रम, विद्यार्थी विकास, रवि लांडगे, डॉ. विजय सूर्यवंशी

प्रतिनिधी: रोहन सोनाळे 

नेदरलँड्स, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रतिनिधींचा सहभाग; विद्यार्थ्यांशी साधला मुक्त संवाद

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक शैक्षणिक सुविधा, डिजिटल शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी अॅडियन (Adyen) या फिनटेक कंपनीच्या आणि युनिसेफ (UNICEF)च्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळाने पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेला भेट दिली. या प्रतिनिधी मंडळात नेदरलँड्स, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका येथील प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या भेटीदरम्यान प्रतिनिधींनी शाळेतील आधुनिक वर्गखोल्या, डिजिटल शिक्षण व्यवस्था, ग्रंथालय, खगोलशास्त्र प्रयोगशाळा आणि STEM प्रयोगशाळांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती देताना शिक्षण समिती सभापती रवीना आंगोळकर यांनी महापालिका शाळांची शैक्षणिक वाटचाल, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, पायाभूत सोयीसुविधा आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना दिली.

महानगरपालिका शिक्षण अधिकारी संगीता बंगार यांनी शाळांचे प्रशासकीय कामकाज, शैक्षणिक नियोजन, व्यवस्थापन व्यवस्था तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांच्या अंमलबजावणीविषयी सविस्तर सादरीकरण केले.

यावेळी महापालिका शाळांमधील अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विशेष कार्यक्रम आणि शैक्षणिक प्रगती यांची माहिती देण्यात आली. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती विकसित करणे, खगोलशास्त्र प्रयोगशाळेद्वारे अवकाश विज्ञानाची आवड निर्माण करणे आणि STEM प्रयोगशाळांच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयांचे प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे प्रतिनिधींनी विशेषतः अवलोकन केले.

विद्यार्थ्यांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळाच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विविध राज्यांच्या परंपरा, संस्कृती आणि कलांचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले. भारताच्या सांस्कृतिक विविधतेची ओळख परदेशी पाहुण्यांना करून देण्याचा हा उपक्रम विशेष ठरला.

याशिवाय, शाळाबाह्य होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित नाटकही विद्यार्थ्यांनी सादर केले. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना पुन्हा शाळेत आणण्याची गरज, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारी यांचा प्रभावी संदेश या नाट्यप्रयोगातून देण्यात आला.

या भेटीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शैक्षणिक उपक्रमांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची संधी मिळाली. आधुनिक तंत्रज्ञान, प्रयोगशील शिक्षण, सांस्कृतिक जाणीव आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका शाळा करीत असलेल्या प्रयत्नांचे यावेळी दर्शन घडले.