मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानाची शपथ; स्वाक्षरी मोहिमेद्वारे जनजागृती
मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत सामूहिक शपथ व स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ आणि चाईल्ड हेल्पलाईन १०९८ बाबत जनजागृती.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
बालविवाह रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि बाल संरक्षण संस्थांचा पुढाकार; संकटात सापडलेल्या बालकांसाठी १०९८ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई : बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला आळा घालून बालकांचे हक्क, शिक्षण आणि सुरक्षित भविष्य जपण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत सामूहिक शपथ आणि स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील भरुचा हॉल येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि होप फॉर दी चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बालस्नेही महाराष्ट्र अभियान’ क्षमता बांधणी कार्यशाळेदरम्यान या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. बालविवाह प्रतिबंधासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
या मोहिमेला पोलीस उपआयुक्त शीला साईल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फणदार, पोलीस निरीक्षक वैशाली सरवदे आणि महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य ॲड. संजय सेंगर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच होप फॉर दी चिल्ड्रेन फाउंडेशनचे पदाधिकारीही यावेळी सहभागी झाले होते.
मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांचे बाल कल्याण पोलीस अधिकारी, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईनचे प्रतिनिधी यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदविला.
बालविवाहमुक्त महाराष्ट्रासाठी सामूहिक शपथ
यावेळी उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रतिनिधींनी महाराष्ट्र बालविवाहमुक्त करण्यासाठी सामूहिक शपथ घेतली. तसेच स्वाक्षरी फलकावर स्वाक्षऱ्या करून बालविवाह प्रतिबंधाच्या मोहिमेला आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला. बालविवाह ही केवळ सामाजिक समस्या नसून बालकांच्या शिक्षणावर, आरोग्यावर, मानसिक विकासावर आणि उज्ज्वल भविष्यावर परिणाम करणारी गंभीर बाब असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि १०९८ हेल्पलाईनबाबत जनजागृती
या अभियानादरम्यान बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ विषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. बालविवाह रोखण्यासाठी कायदेशीर तरतुदींची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तसेच संकटात सापडलेल्या बालकांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या २४ तास सुरू असलेल्या मोफत आपत्कालीन सेवेबाबत जनजागृती करण्यात आली.
एखाद्या परिसरात बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा कोणतेही बालक संकटात सापडल्याचे आढळल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता तातडीने १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
बालविवाह रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या तीन बाबी महत्त्वाच्या आहेत. ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानाच्या माध्यमातून बालकांच्या सुरक्षिततेसह त्यांना शिक्षण आणि विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.