रुग्णांच्या समाधानातच खरी सेवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूरमध्ये ईएसआयसी आढावा बैठकीत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी २५ नवीन रुग्णालयांना मंजुरी दिली. कामगारांना कॅशलेस व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार.

Apr 15, 2026 - 23:06
 0  1
रुग्णांच्या समाधानातच खरी सेवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री, कामगार विमा योजना, रुग्णालय मंजुरी, महाराष्ट्र आरोग्य विभाग,

रुग्णांच्या समाधानातच खरी सेवा – प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. १५ (जिमाका)

कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळणे हेच आरोग्य सेवेचे खरे यश असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (Employees' State Insurance Corporation - ESIC) आणि संलग्न रुग्णालयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीत मंत्री आबिटकर यांनी ईएसआय योजनेशी संलग्न खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. रुग्णांना उपचार देताना येणारे प्रशासकीय अडथळे, प्रलंबित देयके तसेच तांत्रिक प्रक्रियेतील समस्या यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन देत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

कामगारांना दर्जेदार आरोग्य सेवा देताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते नव्याने पात्र ठरलेल्या २५ रुग्णालयांना मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. यापूर्वी ६२ रुग्णालये संलग्न होती; आता नवीन रुग्णालयांच्या समावेशामुळे ही संख्या ८७ वर पोहोचली आहे.

या विस्तारामुळे विमाधारक कामगारांना अधिक खाजगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस आणि दर्जेदार उपचार मिळणार असून, विशेषतः गंभीर आजारांवरील उपचारांसाठी स्थानिक स्तरावरच तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे कामगारांच्या आरोग्य सुरक्षेला अधिक बळकटी मिळणार आहे.

बैठकीत वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. मिलिंद चौधरी यांनी विभागाच्या कामकाजाचा अहवाल सादर केला. यावेळी संचालक डॉ. अशोक थोरात, प्रशासन अधिकारी डॉ. घोंडगे, बाळासो जाधव तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0