श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सवाची सांगता; शेगावात भक्तांची मोठी गर्दी
शेगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात सात दिवस चाललेल्या धार्मिक सप्ताहाची पुण्यतिथीनिमित्त महाआरती व पालखी सोहळ्याने सांगता; हजारो भाविकांची उपस्थिती.
शेगाव | प्रतिनिधी : महेंद्र मिश्रा
शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांची श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सवाने आज सांगता झाली. या निमित्ताने मोठ्या भक्तिभावात विविध धार्मिक विधी, यज्ञ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आयोजित या सप्ताहात ८ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान अखंड नामजप, यज्ञ, श्री गुरुचरित्र पारायण यांसह अनेक धार्मिक उपक्रम पार पडले. सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत महिलांनी तर रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत पुरुषांनी अखंड प्रहर सेवा दिली.
या सप्ताहात गणेशा याग, चंडी याग, स्वामी याग, गीताई याग, रुद्र याग, मल्हारी याग आदी विविध यज्ञ विधी संपन्न झाले. तसेच श्री स्वामीचरित्र सारामृत, दुर्गासप्तशती पाठ, विष्णुसहस्रनाम, गीतेचा १५ वा अध्याय, तुकारामांचे अभंग आणि मनाचे श्लोक यांचेही पठण करण्यात आले.
बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी श्री सत्यदत्त पूजन व महाआरतीने सप्ताहाची सांगता करण्यात आली. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची भव्य पालखी सोहळा काढण्यात आला. “जय जय श्री स्वामी समर्थ” या नामघोषात पालखी छत्रपती संभाजी चौक व स्वामी विवेकानंद चौक मार्गे पुन्हा केंद्रात दाखल झाली.
या उत्सवात सुमारे अडीच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, तर शहरासह तालुक्यातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक तोरणांनी सजविण्यात आला होता.
सप्ताहादरम्यान ३३१ हून अधिक भाविकांनी श्री गुरुचरित्र पारायण पूर्ण करून या धार्मिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0