नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रकल्प वेळेत व गुणवत्तेसह पूर्ण करा – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची महापौर रवि लांडगे यांनी पाहणी करून गुणवत्ता राखत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. १० एप्रिल २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरू असलेल्या कामाचा महापौर रवि लांडगे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी कामाची गुणवत्ता अबाधित राखत प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
चिंचवड येथील सायन्स पार्कजवळ उभारण्यात येत असलेली ही नवीन प्रशासकीय इमारत नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि आधुनिक सेवा देणारे केंद्र ठरणार असल्याचे महापौरांनी नमूद केले. त्यामुळे कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पाहणी दौऱ्यावेळी नगरसदस्या सुप्रिया चांदगुडे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य कुशाग्र कदम, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले की, शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करून ही इमारत उभारली जात असून ती नागरिकांसाठी एक आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा केंद्र ठरणार आहे. विविध विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध होऊन नागरिकांना अधिक जलद व सोयीस्कर सेवा मिळणार आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, प्रकल्पाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून गुणवत्ता, सुरक्षा आणि वेळेचे नियोजन यावर विशेष लक्ष दिले जात आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत.
मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी यावेळी इमारतीच्या कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती सादर केली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0