एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी प्रशासनिक शिस्त, संसाधनांचा प्रभावी वापर आणि व्यापक सुधारणा आराखडा राबविण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

Apr 16, 2026 - 05:15
 0  8
एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
एसटी महामंडळ, प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक स्थितीचा आढावा घेत परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तोटा कमी करण्यासाठी ठोस आणि सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनिक शिस्त, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि जबाबदारी निश्चिती यावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी लवकरच व्यापक सुधारणा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

२०२५-२६ या आर्थिक वर्षात एसटीचे एकूण उत्पन्न ११,४७५ कोटी रुपये असून खर्च १२,०६६ कोटी रुपये झाला आहे. दैनंदिन सरासरी उत्पन्न ३१ कोटी ४० लाख रुपये असून खर्च ३३ कोटी रुपये आहे. या पार्श्वभूमीवर दैनंदिन तोटा कमी करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मागील आर्थिक वर्षात जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे विभाग नफ्यात होते. उर्वरित २३ विभागांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

“येत्या काळात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून उपलब्ध बसेस आणि मनुष्यबळाचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करणे अत्यावश्यक आहे,” असे सरनाईक यांनी सांगितले.

तोट्यातील विभागांची सखोल चौकशी करून त्यामागील कारणांचा अभ्यास करावा आणि त्यावर ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच नागपूर विभागातील कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यास सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0