१ जूनपासून राज्यातील सर्व बसस्थानकांवर शौचालय सुविधा मोफत – मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

राज्यातील सर्व बसस्थानकांवर १ जूनपासून शौचालय सुविधा मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापुरात केली. प्रवाशांच्या सोयीसाठी स्वच्छता आणि सुविधा सुधारण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Apr 17, 2026 - 21:57
 0  1
१ जूनपासून राज्यातील सर्व बसस्थानकांवर शौचालय सुविधा मोफत – मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

कोल्हापूर, दि. १७ एप्रिल २०२६ : राज्यातील प्रवाशांसाठी दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, येत्या १ जून २०२६ पासून महाराष्ट्रातील सर्व बसस्थानकांवरील शौचालय सुविधा पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

प्रवाशांकडून बस तिकीटामध्ये आधीच स्वच्छता कर वसूल केला जात असल्याने, आता शौचालय व्यवस्थेचा खर्च महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) स्वतः उचलणार आहे. त्यामुळे खासगी कंत्राटदारांकडून चालवली जाणारी शौचालय व्यवस्था बंद करून ती थेट महामंडळाच्या नियंत्रणाखाली आणण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने उभारण्यात आलेल्या चार बसस्थानकांच्या उद्घाटनासाठी आलेल्या मंत्री सरनाईक यांनी मध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छता गृह, उपाहारगृह, हिरकणी कक्ष आणि प्रवासी कक्षांची पाहणी केली. यावेळी प्रवाशांशी संवाद साधताना शौचालयासाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी त्यांनी गांभीर्याने घेतल्या.

स्थानकातील स्वच्छता केवळ दौऱ्यापुरती मर्यादित न ठेवता ती कायमस्वरूपी राखली जावी, यासाठी दर चार तासांनी स्वच्छता करणे अनिवार्य असल्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

तसेच उपाहारगृहात गरजूंसाठी ३० रुपयांत चहा-नाश्ता देण्याची योजना प्रभावीपणे राबवली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ही योजना २४ तासांत पुन्हा सुरू करून त्याची स्पष्ट माहिती दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात आले. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या पाहणीदरम्यान प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहत्तर, कार्यकारी अभियंता नागेश कुलकर्णी, विभाग नियंत्रक अभय देशमुख, विभागीय अभियंता सुरेश मोहिते यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

प्रवाशांकडून बेकायदेशीर शुल्क वसूल करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यातील बसस्थानकांवरील सुविधा अधिक दर्जेदार आणि प्रवासीहिताच्या करण्यावर सरकारचा विशेष भर असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0