राज्यात 100 ‘महात्मा जोतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ सुरू होणार; युवकांना मोठी संधी – मंत्री मंगल प्रभात लोढा

राज्यात युवक-युवतींना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात 100 केंद्र सुरू होणार आहेत. भविष्यात ही संख्या 1000 पर्यंत वाढवण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

Apr 17, 2026 - 01:10
 0  5
राज्यात 100 ‘महात्मा जोतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ सुरू होणार; युवकांना मोठी संधी – मंत्री मंगल प्रभात लोढा
मंगल प्रभात लोढा, कौशल्य प्रशिक्षण केंद्र

मुंबई, दि. 16 : राज्यातील युवक-युवतींना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘महात्मा जोतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत प्रथम टप्प्यात राज्यभरात 100 केंद्र सुरू करण्यात येणार असून, भविष्यात ही संख्या 1000 पर्यंत वाढविण्याचा मानस आहे.

ही माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन विविध शहरी समस्यांसह युवकांच्या रोजगारासाठी या योजनेबाबत सविस्तर चर्चा केली.

मंत्री लोढा यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणासोबत कौशल्याची जोड देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या केंद्रांमध्ये शहरी भागातील आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. झोपडपट्टी परिसरातही ही केंद्रे सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे वंचित घटकांनाही मोठा लाभ होणार आहे.

“पदवीसोबत कौशल्य असणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतात,” असेही लोढा यांनी नमूद केले.

यावेळी मुंबईतील हँगिंग गार्डन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प उभारणे तसेच सायन येथील ‘अम्मान देखनी’ संस्थेजवळील अतिक्रमण हटवण्याबाबतही चर्चा झाली. राज्य शासन आणि महानगरपालिका मिळून मुंबईच्या पायाभूत सुविधा व युवकांच्या भविष्यासाठी काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0