पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षणाच्या कामांना स्थायी समितीची मंजुरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. झोपडपट्टी भागातील सुविधा, रस्ते दुरुस्ती, रुग्णालये व शाळांसाठीही मोठे निर्णय घेण्यात आले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व स्वच्छता क्षेत्रातील विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पायाभूत सुविधा व स्वच्छता कामांना गती
शहरातील झोपडपट्टी व दाट वस्त्यांमध्ये गटार व्यवस्था, स्टॉर्म वॉटर लाईन, शौचालय दुरुस्ती, रंगरंगोटी व इमारतींची देखभाल यांसारखी कामे मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत विविध भागांमध्ये स्वच्छतेच्या उपक्रमांना चालना दिली जाणार आहे.
रस्ते व वाहतूक सुधारणा
निगडी-दापोडी रस्ता, सांगवी-किवळे मार्ग, वाकड, ताथवडे, रावेत, किवळे, चिखली, मोशी आदी भागांतील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण व दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पिंपळे सौदागर येथील पीके चौक सिग्नल फ्री करण्यासाठी आणि वाकड-नाशिक फाटा मार्गावर सबवे उभारण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आरोग्य सेवा बळकट
आकुर्डी व भोसरी येथील रुग्णालयांमध्ये एक्स-रे विभागासाठी साहित्य खरेदी, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, तसेच थेरगाव येथे ३४० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीसाठी फर्निचर खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विविध पदांची भरतीही करण्यात येणार आहे.
शिक्षण व प्रशासनातील निर्णय
महापालिका शाळांमध्ये १३८ डेटा एन्ट्री ऑपरेटर नियुक्ती, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाई, संगणकीय नेटवर्क उभारणी, तसेच विकास आराखडा मराठीत प्रसिद्ध करण्यासाठी खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
पर्यावरण व स्वच्छतेवर भर
महिला बचत गटांमार्फत शौचालय देखभाल कामांना मुदतवाढ व मानधनवाढ, शून्य कचरा प्रकल्प राबविण्यास मंजुरी, तसेच रस्ते साफसफाई, अतिक्रमण हटविणे आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे निर्णय घेण्यात आले.
इतर महत्त्वाचे निर्णय
अग्निशमन वाहनांची दुरुस्ती, स्मशानभूमी सुधारणा, वाहने भाडेतत्त्वावर घेणे, तसेच पीएमपीएमएलला अनुदान देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
एकूणच, या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे व्यापक निर्णय घेण्यात आले असून पिंपरी-चिंचवड शहर अधिक सक्षम व सुविधा संपन्न करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0