केईएम रुग्णालयात HMIS प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करा – आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश
मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केईएम रुग्णालयात HMIS प्रणाली प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले. यामुळे रुग्णांना तंत्रज्ञानाधारित, जलद व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून विविध शासकीय योजनांचा लाभही अधिक प्रभावीपणे मिळणार आहे.
उदय कासारे - मुंबई प्रतिनिधी
मुंबई, दि. १७ एप्रिल २०२६ (प्रतिनिधी) : मुंबईतील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम’ (HMIS) प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.
आज केईएम रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी विविध विभागप्रमुखांशी चर्चा करत HMIS प्रणाली अंतर्गत उपलब्ध माहिती आणि डॅशबोर्डचा नियमित आढावा घेण्यावर भर दिला. रुग्णांना तंत्रज्ञानस्नेही आणि सुलभ आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रणाली अधिक सक्षम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, अधिष्ठाता डॉ. संगीता रावत तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. आयुक्तांनी नोंदणी कक्ष, अतिदक्षता विभाग, अपघात विभाग आणि सर्वसाधारण कक्षांची पाहणी करून रुग्णसेवेचा आढावा घेतला.
HMIS प्रणालीद्वारे रुग्णांची नोंदणी, तपासण्या, वैद्यकीय अहवाल आणि उपचारांची माहिती एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात उपलब्ध होत आहे. ही प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करत रुग्णाभिमुख सेवा देण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यास सांगण्यात आले. तसेच अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, रक्तचाचणी प्रयोगशाळा, एमआरआय आणि सीटी स्कॅन सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना आणि पीएम-राहत यांसारख्या योजनांचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळावा यासाठी HMIS प्रणालीशी त्यांचे समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले.
केईएम रुग्णालयावर वाढत असलेला ताण कमी करण्यासाठी उपनगरीय रुग्णालये, दवाखाने आणि प्रसुतीगृहांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला. रुग्ण हस्तांतरणासाठी प्रभावी लिंकेज सिस्टिम विकसित करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
एकूणच, HMIS प्रणालीच्या माध्यमातून केईएम रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि रुग्णकेंद्रित करण्यावर भर देण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0