गडचिरोलीत ‘उडान’ प्रोजेक्टमधून 1278 युवकांना रोजगार; कौशल्याधारित शिक्षणावर भर – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल

गडचिरोली येथे प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत आयोजित रोजगार मेळाव्यात 1278 युवकांना रोजगार संधी मिळाली. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

Apr 16, 2026 - 22:25
 0  1
गडचिरोलीत ‘उडान’ प्रोजेक्टमधून 1278 युवकांना रोजगार; कौशल्याधारित शिक्षणावर भर – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल
गडचिरोली रोजगार मेळावा, प्रोजेक्ट उडान,

गडचिरोली, दि. 16 : आधुनिक युगातील बदलत्या गरजांनुसार युवकांनी पारंपरिक शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्ये आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत भव्य रोजगार मेळावा व वाहन लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहपालकमंत्री जयस्वाल बोलत होते. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविशांत पांडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात सहपालकमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते प्रतीकात्मक स्वरूपात युवकांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच माओवादविरोधी अभियानासाठी प्राप्त 31 चारचाकी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

या रोजगार मेळाव्यात देशातील 38 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. दुर्गम व अतिदुर्गम भागातील 4000 हून अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली होती, तर सुमारे 2400 उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित होते. त्यापैकी एकूण 1278 युवकांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली असून त्यांना वार्षिक 1.80 लाख ते 3.60 लाख रुपयांपर्यंतचे वेतन पॅकेज मिळाले आहे.

मार्गदर्शन करताना जयस्वाल म्हणाले की, केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून कौशल्याधारित शिक्षणाची जोड अत्यावश्यक आहे. स्पर्धात्मक युगात युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा. स्वतःचा विकास साधत असताना जिल्ह्याच्या प्रगतीतही योगदान द्यावे.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे. विविध उद्योग, खनिज संपत्ती आणि विकास प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी वाढत आहेत, ज्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीस गती मिळणार आहे.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत युवकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

गडचिरोली पोलीस दलाने माओवाद नियंत्रणासोबतच युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकास आणि रोजगार उपक्रम राबवले आहेत. या रोजगार मेळाव्यामुळे दुर्गम भागातील युवकांना नवसंजीवनी मिळणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0