मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांचा ९२.८९% निकाल; चार शाळांचा १००% यश

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई संलग्न शाळांचा दहावीचा निकाल ९२.८९ टक्के लागला असून चार शाळांनी १०० टक्के यश मिळवले आहे. आर्या लामने ९७.८ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.

Apr 16, 2026 - 01:52
 0  9
मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांचा ९२.८९% निकाल; चार शाळांचा १००% यश
आर्या लामने ९७.८ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.

मुंबई प्रतिनिधी - उदय कासारे 

दि. १५ एप्रिल २०२६ :

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न ११ शाळांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यंदा या शाळांचा एकूण निकाल ९२.८९ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रगती दर्शवली आहे.

या परीक्षेसाठी एकूण ३३९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये मिठागर सीबीएसई शाळेतील कुमारी आर्या लामने हिने ९७.८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर पुनम नगर शाळेतील सौरभ यादव (९७.२%), राजावाडी शाळेतील कौस्तुभ त्रिपाठी (९७%), पुनम नगर शाळेतील आर्यन मयेकर (९६.६%) आणि श्रेया सिंग (९६.४%), तसेच मिठा नगर शाळेतील माही सोळंकी (९६.२%) यांनी उत्कृष्ट यश मिळवले.

विशेष म्हणजे भवानी शंकर रोड (दादर), राजावाडी (घाटकोपर), मिठा नगर (मुलुंड) आणि पुनम नगर (अंधेरी) या चार शाळांनी १०० टक्के निकालाची कामगिरी केली आहे.

या निकालातून विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली असल्याचे दिसून आले आहे. काही विद्यार्थ्यांनी मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवत विशेष प्राविण्यही मिळवले आहे.

विद्यार्थ्यांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांचा हा एकत्रित परिणाम असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0