टाटा मुंबई मॅरेथॉन परिवर्तनाचा मंच; आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यावर भर – जयकुमार रावल

टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे सामाजिक परिवर्तनाला चालना मिळत असून ७५०० कोटींपेक्षा अधिक निधी उभारला गेला आहे. मंत्री जयकुमार रावल यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यावर भर दिला.

Apr 16, 2026 - 04:58
 0  10
टाटा मुंबई मॅरेथॉन परिवर्तनाचा मंच; आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यावर भर – जयकुमार रावल
टाटा मुंबई मॅरेथॉन, जयकुमार रावल, मुंबई बातमी

मुंबई, दि. १५ :

टाटा मुंबई मॅरेथॉन ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून सामाजिक परिवर्तनाला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

हॉटेल ट्रायडेंट येथे आयोजित ‘ग्रॅटिट्यूड कार्यक्रमात’ मंत्री रावल यांच्या हस्ते मॅरेथॉनसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. “ही धाव अंतरासाठी नाही, तर बदलासाठी आहे,” असे सांगत त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

मंत्री रावल म्हणाले की, प्रोकॅम इंटरनॅशनलने दोन दशकांपूर्वी सुरू केलेली ही संकल्पना आज जागतिक स्तरावर प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धांपैकी एक बनली आहे. या मॅरेथॉनद्वारे आतापर्यंत ७५०० कोटी रुपयांहून अधिक निधी उभारण्यात आला असून, यावर्षीच सुमारे ७६० कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे.

या उपक्रमाचा समाजावर होणारा परिणाम स्पष्ट करताना त्यांनी ‘मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’ आणि ‘अक्षय पात्र फाउंडेशन’च्या कार्याचा उल्लेख केला. या संस्थांमुळे वंचित घटकांतील मुलांना शिक्षण, जीवनकौशल्ये आणि पोषण आहार मिळत असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत.

टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे महाराष्ट्राला जागतिक ओळख मिळाली असून ६० हून अधिक देशांतील सहभागामुळे राज्याची आयोजन क्षमता अधोरेखित झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर

याच दिवशी जागतिक व्यापार केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात ‘कौन्सिल ऑफ कॉर्प्स असोसिएशन ऑफ मुंबई’च्या नव्या नेतृत्वाचा सत्कार करण्यात आला. स्वीडनचे महावाणिज्यदूत स्वेन ऑस्टबर्ग यांची डीन म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना मंत्री रावल यांनी आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज अधोरेखित केली. मुंबईसारख्या जागतिक शहरात वाणिज्यदूतांच्या माध्यमातून व्यापार, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि लोकांमधील संबंध अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासन राजनैतिक समुदायाशी संवाद आणि सहकार्य वाढवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नवनियुक्त डीन स्वेन ऑस्टबर्ग यांनीही जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर संवाद आणि सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मूल्यांवर आधारित एकत्रित प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0