पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणी व वृक्षगणनेची तयारी; बीएमसीकडून जिजामाता उद्यानात प्रशिक्षण शिबिर

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने जिजामाता उद्यानात वृक्ष छाटणी व वृक्षगणनेबाबत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लवकरच वृक्षगणना सुरू होणार आहे.

Apr 16, 2026 - 01:41
 0  4
पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणी व वृक्षगणनेची तयारी; बीएमसीकडून जिजामाता उद्यानात प्रशिक्षण शिबिर
बीएमसीकडून जिजामाता उद्यानात प्रशिक्षण शिबिर

मुंबई प्रतिनिधी - उदय कासारे 

मुंबई : पावसाळ्यापूर्व तयारीचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात वृक्ष छाटणी आणि वृक्षगणनेबाबत एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात धोकेदायक ठरू शकणाऱ्या झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी कशी करावी तसेच वृक्षगणना करताना अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पुढील आठवड्यापासून मुंबईतील वृक्षगणना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

या शिबिरास उप उद्यान अधीक्षक साहेबराव गावित, सहायक उद्यान अधीक्षक अविनाश यादव, वृक्षतज्ज्ञ विवेक राणे, योगेश कुटे यांच्यासह उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी मुंबईतील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. यामध्ये पर्यावरणाचे संतुलन राखत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यंदा ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.

प्रशिक्षणादरम्यान वृक्ष छाटणी, वृक्षांची जनगणना, मातीची आर्द्रता, हवेचा वेग, तसेच बांधकामादरम्यान वृक्षांचे संरक्षण कसे करावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

वृक्षतज्ज्ञांनी वृक्षांचे व्यवस्थापन, नुकसान टाळण्याच्या उपाययोजना आणि बदलत्या हवामानात वृक्षसंवर्धन कसे करावे यावर मार्गदर्शन केले. तसेच ड्रोनच्या सहाय्याने वृक्षगणना कशी केली जाणार याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0