पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; ‘राकट देशा’ महाराष्ट्राच्या जिद्दीची ओळख – महापौर रवि लांडगे

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन, कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महापौर रवि लांडगे यांनी महाराष्ट्राच्या जिद्द, संघर्षशीलता आणि मराठी भाषेच्या अभिमानाचा गौरव केला.

पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; ‘राकट देशा’ महाराष्ट्राच्या जिद्दीची ओळख – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड बातम्या, महाराष्ट्र दिन 2026, रवि लांडगे,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. १ मे २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले, ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ ही केवळ ओळ नसून महाराष्ट्राच्या जिद्दीची, संघर्षशीलतेची आणि आत्मविश्वासाची ओळख आहे. महाराष्ट्राने प्रतिकूल परिस्थितीतही विकासाचा मार्ग स्वीकारला असून मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा कणा असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडची ओळख श्रम, भक्ती आणि पराक्रमाची

महापौर लांडगे पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड हे केवळ शहर नसून भक्ती, शक्ती, पराक्रम आणि श्रम यांच्या संगमातून घडलेली ओळख आहे. भक्ती शक्ती समूहशिल्प, मोरया गोसावींची परंपरा तसेच चिंचवडमधील चापेकर बंधूंचा ऐतिहासिक वारसा शहराला प्रेरणा देणारा आहे.

हजारो कामगारांच्या कष्टातून उभी राहिलेली ही औद्योगिक नगरी महाराष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अनेक मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनगणना २०२७ जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जनगणना २०२७ संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एलईडी व्हॅन प्रचार मोहिमेचा शुभारंभ महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.

या मोहिमेद्वारे शहरातील विविध भागांत फिरून नागरिकांना स्वयं-नोंदणी प्रक्रियेची माहिती देण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.

विकासाचा संकल्प अधिक दृढ

पिंपरी-चिंचवड शहराला अधिक सक्षम, समृद्ध आणि सर्वसमावेशक बनवण्याचा संकल्प अधिक दृढ असल्याचे सांगत कामगारांच्या कष्टाचा सन्मान राखत विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले