‘ई-निरसन’ प्रणालीचा शुभारंभ; तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना सुलभ व पारदर्शक सेवा – मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘ई-निरसन’ ही डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली असून, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Apr 23, 2026 - 04:40
 0  10
‘ई-निरसन’ प्रणालीचा शुभारंभ; तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना सुलभ व पारदर्शक सेवा – मंत्री चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील, तांत्रिक शिक्षण

मुंबई, दि. २२ : विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे जलद आणि पारदर्शक निवारण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने ‘ई-निरसन’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली विकसित केली असून, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना अधिक सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘ई-निरसन’ प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव आणि कुलसचिव डॉ. शेष उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, परीक्षा निकाल, गुणपत्रिका, पुनर्मूल्यांकन, प्रमाणपत्र आदी संदर्भातील तक्रारींसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विद्यापीठात जाण्याची गरज भासू नये, यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ही प्रणाली तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण करून संबंधित विभागाकडे तत्काळ पाठवते. तसेच ‘लाईव्ह ट्रॅकिंग’मुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारीची सद्यस्थिती सहज पाहता येते.

या प्रणालीमुळे तक्रार निवारण प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार असून विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. तक्रार नोंदवल्यानंतर विद्यार्थ्यांना ‘ग्रिव्हन्स आयडी’ दिला जातो, ज्याद्वारे ते तक्रारीची प्रगती कधीही तपासू शकतात. प्रत्येक टप्प्यावर एसएमएस आणि ईमेलद्वारे सूचना दिल्या जातात.

गेल्या काही वर्षांत परीक्षा निकालातील विलंब आणि तक्रार प्रक्रियेतील अडचणींमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी सातत्याने आढावा घेत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.

🌍 परदेशी रोजगारासाठी नवे दालन

याच कार्यक्रमात तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परदेशातील रोजगार संधी वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) यांच्यात हा करार झाला.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, जर्मनी, जपान आणि रशिया यांसारख्या देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या देशांची भाषा आणि संस्कृतीचे प्रशिक्षण देण्यावर विशेष भर दिला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्यात वाढ होऊन त्यांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील.

या करारानुसार, CII हे उद्योग समन्वय आणि प्रशिक्षण भागीदार म्हणून काम करणार असून MSBTE कडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येणार आहे.

हा उपक्रम राज्यातील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.