महिला आरक्षण विधेयकावर विरोधकांवर आरोप; रामदास आठवले यांची नाशिकमध्ये टीका
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत महिला आरक्षण विधेयकावर विरोधकांवर टीका करत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. अंधश्रद्धा आणि मतदार यादीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
नाशिक प्रतिनिधी : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर टीका केली. “नियोजनपूर्वक या विधेयकाला अडथळा आणण्यात आला,” असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते पुढे म्हणाले की, डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) साधारणतः ३०-४० वर्षांनी आवश्यक असते. हे विधेयक मंजूर झाले असते, तर सर्व राज्यांमध्ये जागा वाढल्या असत्या आणि त्यामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाले असते.
अंधश्रद्धेबाबत बोलताना आठवले यांनी नागरिकांना इशारा दिला की, “बाबा-बुवांच्या नादी लागू नये. त्यांच्या आशीर्वादाने मंत्रीपद मिळते, ही अंधश्रद्धा आहे.” लोकांची मानसिकता बदलल्यामुळे अशा घटना घडत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मतदार यादीतील त्रुटींवर बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय निवडणूक आयोग यांच्यामार्फत मृत व्यक्तींची नावे वगळण्यासाठी मोहीम राबवली जाते. प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला आरक्षण विधेयकाबाबत त्यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. विरोधकांनी उत्तर आणि दक्षिण भारत असा भेदभाव न करता विधेयकाला पाठिंबा दिला असता, तर महिलांवर अन्याय झाला नसता, असेही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी नमूद केले की, “अमेरिका-इराण चर्चा पाकिस्तानऐवजी भारतात झाली असती, तर काही सकारात्मक मार्ग निघाला असता.”
तसेच, आपल्या पक्षाला पुढील पाच वर्षांत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संविधानाने महिलांना समान हक्क दिले असून रिपब्लिकन पक्ष महिलांच्या बाजूने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यास महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. “असे वक्तव्य करणे योग्य नव्हते,” असे सांगताना त्यांनी खरगे यांच्या पूर्वीच्या कार्याचे कौतुकही केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0