‘समग्र महात्मा फुले’ परिसंवादातून सामाजिक परिवर्तनाचा वैचारिक मागोवा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘समग्र महात्मा फुले’ परिसंवादात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा सखोल वेध घेत आजच्या काळातील त्यांची उपयुक्तता अधोरेखित करण्यात आली.

Apr 21, 2026 - 18:14
 0  2
‘समग्र महात्मा फुले’ परिसंवादातून सामाजिक परिवर्तनाचा वैचारिक मागोवा
महात्मा फुले परिसंवाद, पिंपरी चिंचवड बातमी,

पुणे प्रतिनिधी –रोहन सोनाळे 

 क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा सखोल वेध घेत शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, जातीभेद निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांवर आधारित समाजरचनेची आवश्यकता ‘समग्र महात्मा फुले’ या परिसंवादातून अधोरेखित करण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताह व ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’च्या समारोपीय कार्यक्रमात या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या परिसंवादात साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, माजी आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड तसेच फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा, साहित्याचा आणि सामाजिक विचारांचा सखोल आढावा घेतला.

साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी महात्मा फुले यांच्या साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन कसे घडले, यावर प्रकाश टाकला. त्यांनी संत साहित्याचा प्रभाव स्वीकारत समाजपरिवर्तनासाठी कार्य केले, असे त्यांनी नमूद केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले यांना ‘तिसरे गुरू’ का मानले, याची जाणीव त्यांच्या लिखाणातून होते, असे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ आणि ‘सार्वजनिक सत्यधर्म’ यांसारख्या ग्रंथांच्या माध्यमातून फुले यांनी तत्कालीन व्यवस्थेवर केलेल्या प्रखर टीकेचे विश्लेषण केले. त्यांनी सामाजिक विषमता आणि अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले.

माजी आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी महात्मा फुले यांच्या मानवतावादी दृष्टिकोनावर भाष्य करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी शिक्षणक्रांती घडवली, असे सांगितले. तसेच अस्पृश्यतेविरुद्ध उभारलेला लढा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी ‘गुलामगिरी’ या ग्रंथाच्या माध्यमातून समाजात क्रांतीची बीजे रोवली गेली, असे नमूद करत फुले यांच्या विचारांचे जागतिक महत्त्व स्पष्ट केले. ‘विज्ञानाची काच धरा’ हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. सुजाता नांगरे, ग्रंथपाल प्रवीण चाबुकस्वार, राजू मोहन, कामगार नेते निवृत्ती आरवडे, तुकाराम गायकवाड, गणेश भोसले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच या परिसंवादातून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा परस्पर संबंध, सामाजिक समतेसाठीची त्यांची लढाई आणि आजच्या काळातील त्यांची उपयुक्तता यावर सखोल चर्चा झाली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0