मौलाना शौकत अली मार्गावरील अतिक्रमणांवर BMCची धडक कारवाई; फर्निचर विक्रेत्यांचे निष्कासन

मुंबईतील मौलाना शौकत अली मार्गावर अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाने धडक कारवाई करत फर्निचर विक्रेत्यांचे निष्कासन केले.

Apr 22, 2026 - 19:31
 0  1
मौलाना शौकत अली मार्गावरील अतिक्रमणांवर BMCची धडक कारवाई; फर्निचर विक्रेत्यांचे निष्कासन
मौलाना शौकत अली मार्गावरील अतिक्रमणांवर BMCची धडक कारवाई;

बृहन्मुंबई महानगरपालिका (दि. 21 एप्रिल 2026): मुंबई शहरातील मौलाना शौकत अली मार्गावरील अतिक्रमणांवर ‘ई’ विभागाकडून धडक निष्कासन कारवाई करण्यात आली.

उपायुक्त (परिमंडळ 1) श्रीमती चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त आनंद कंकाळ यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली.

मौलाना शौकत अली मार्गावर, विशेषतः मुरली देवरा नेत्र रुग्णालय ते जे. जे. रुग्णालय सिग्नलदरम्यान मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. पदपथांवर जुने फर्निचर पसरविल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी अडथळे निर्माण झाले होते, परिणामी त्यांना रस्त्यावरून चालावे लागत होते व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.

ही बाब लक्षात घेऊन ‘ई’ विभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकाने मुंबई पोलीस यांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई केली.

कारवाईदरम्यान पदपथांवर ठेवलेले जुने फर्निचर जेसीबीच्या सहाय्याने जागेवरच हटविण्यात आले. तसेच फर्निचरचा कचरा तात्काळ साफ करण्यात आला. परिसरातील सर्व अतिक्रमणे दूर करून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत 1 जेसीबी, 4 मजूर, 3 अधिकारी आणि 2 अभियंते सहभागी होते. तसेच, नागपाडा पोलीस ठाणे येथील 9 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांविरोधात अशी कारवाई पुढेही नियमितपणे सुरू ठेवली जाईल, असे महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0