मुंबईत लहान प्राणी व पक्ष्यांसाठी दहनवाहिनी सेवा सुरू; देवनार आणि महालक्ष्मी येथे सुविधा कार्यान्वित

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देवनार आणि महालक्ष्मी येथे लहान प्राणी व पक्ष्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दहनवाहिनी सेवा सुरू करण्यात आली असून नागरिकांना ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.

Apr 16, 2026 - 22:19
 0  0
मुंबईत लहान प्राणी व पक्ष्यांसाठी दहनवाहिनी सेवा सुरू; देवनार आणि महालक्ष्मी येथे सुविधा कार्यान्वित
प्राणी दहनवाहिनी, BMC सेवा, देवनार पशुवधगृह,

मुंबई, दि. १६ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाकडून देवनार पशुवधगृह आणि महालक्ष्मी येथे लहान प्राणी व पक्ष्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दहनवाहिनी सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा १ एप्रिल २०२६ पासून नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही सेवा सुरू करण्यात आली असून, शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये स्वतंत्र दहनवाहिनी सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबईतील भटके व पाळीव प्राण्यांच्या व्यवस्थापनासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असून, मृत प्राण्यांचे शास्त्रोक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी ही दहनवाहिनी सुरू करण्यात आली आहे.

देवनार येथील दहनवाहिनीत ५०० किलोपर्यंत वजन असलेल्या प्राणी किंवा पक्ष्यांचे अंत्यसंस्कार करता येतात. ही सुविधा पीएनजी इंधनावर चालणारी असून पर्यावरणपूरक आहे. महालक्ष्मी येथील दहनवाहिनी ५० किलोपर्यंतच्या प्राण्यांसाठी असून ती पूर्णपणे विद्युत (इलेक्ट्रिक) प्रणालीवर आधारित आहे.

यापूर्वी मालाड येथे २०२३ पासून अशी सुविधा उपलब्ध असून, आता मुंबईतील तीनही भागांत दहनवाहिन्यांची व्यवस्था उपलब्ध झाली आहे.

नागरिकांसाठी या सेवेसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा खालील लिंकद्वारे नोंदणी करता येईल:

👉 https://vhd.mcgm.gov.in/incineration-booking⁠�

नोंदणी केल्यानंतर निश्चित वेळेनुसार निवडलेल्या ठिकाणी अंत्यसंस्कार करता येतील. अधिक माहितीसाठी ७५६४९७६६४९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागप्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0