दुष्काळ व एल निनो पार्श्वभूमीवर राज्य सज्ज; पाणी, शेती आणि चारा व्यवस्थेसाठी टास्क फोर्सचे निर्देश

राज्यात पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीटंचाई, शेती आणि चारा व्यवस्थेसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विविध उपाययोजनांची माहिती दिली.

Apr 20, 2026 - 23:54
 0  2
दुष्काळ व एल निनो पार्श्वभूमीवर राज्य सज्ज; पाणी, शेती आणि चारा व्यवस्थेसाठी टास्क फोर्सचे निर्देश
महाराष्ट्र दुष्काळ तयारी, एल निनो प्रभाव, देवेंद्र फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी – राज्यात संभाव्य एल निनो आणि कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर पाणी, शेती आणि पशुधन व्यवस्थेसाठी राज्य सरकारने व्यापक तयारी सुरू केली आहे. पर्जन्यमान ९० टक्क्यांपेक्षा कमी राहिल्यास पिण्याच्या पाण्यासह शेतीवर मोठा परिणाम होऊ शकतो, याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करून पाण्याचा काटेकोर वापर व साठवण सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समन्वयातून पाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार आहे.

मनरेगा योजनेअंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देत उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच केवळ चालू वर्षाचा नव्हे तर पुढील उन्हाळ्याचाही विचार करून पाणी नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.

पशुधनासाठी चारा टंचाई टाळण्यासाठीही आतापासूनच नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोलापूर, सांगली आणि मराठवाडा या भागांमध्ये चारा उपलब्धतेसाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. धरणांच्या बॅकवॉटर क्षेत्रात चारा विकास कार्यक्रम राबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

खत व बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ प्रणालीशी खत वितरण जोडून पारदर्शकता वाढवण्यावर तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तपासणी यंत्रणा मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.

यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, संभाव्य अडचणी लक्षात घेऊन कृषी विभागाने सर्व अधिकारी स्तरावर बैठक घेऊन उपाययोजना निश्चित केल्या आहेत. खरीप हंगामात पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी वेळेवर खतांचा पुरवठा सुनिश्चित केला जाणार आहे. विशेषतः डीएपी खताचे वितरण नियोजनबद्ध पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच कृत्रिम टंचाई टाळण्यासाठी विक्री केंद्रांची तपासणी केली जाणार असून, महाबीजसह इतर संस्थांना बियाणे व चारा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसातील अनिश्चिततेमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त तयारी करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना पाणी साठवणुकीसाठी शेततळे योजना प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक साहित्य, विशेषतः प्लास्टिक लाइनिंग उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विभाग पूर्णपणे सज्ज असून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने राबवण्यात येत असल्याचेही कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0