आरोग्य योजनांसाठी एकीकृत व्यवस्थापन प्रणाली लागू करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
राज्यातील रुग्णांना वैद्यकीय मदत अधिक सुलभ व प्रभावी मिळावी यासाठी विविध आरोग्य योजनांचे एकत्रिकरण करून एकीकृत व्यवस्थापन प्रणाली लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील नागरिकांना आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत अधिक सुलभ आणि प्रभावी पद्धतीने मिळावी यासाठी विविध आरोग्य योजनांचे एकत्रिकरण करून एकीकृत व्यवस्थापन कार्यपद्धती लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत ‘मुख्यमंत्री शासकीय योजना मदत व समन्वय कक्ष’ या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी ‘मित्रा’ (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी सादरीकरण केले. तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव किरण वसाका यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत) तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रुग्णांना मदत दिली जाते. मागील वर्षभरात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ५.२२ लाख, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत २.१८ लाख अर्ज प्राप्त झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले आहे.
आतापर्यंत विविध योजनांद्वारे सुमारे ३,२४३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनांचा अधिक प्रभावी वापर व्हावा आणि लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी सेवा मिळावी यासाठी एकीकृत आरोग्य लाभार्थी व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे योजनांचे समन्वय, रुग्णालयांचे व्यवस्थापन आणि लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0