माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वृत्तांकन करावे – विजया रहाटकर

मुंबईत आयोजित ‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान’ कार्यशाळेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी माध्यमांनी महिलांशी संबंधित विषय हाताळताना संवेदनशीलता आणि अचूकतेवर भर देण्याचे आवाहन केले.

Apr 21, 2026 - 00:37
Apr 21, 2026 - 00:38
 0  9
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वृत्तांकन करावे – विजया रहाटकर

मुंबई/प्रतिनिधी – माध्यमे ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती आहेत. त्यामुळे महिलांशी संबंधित विषय हाताळताना विशेष संवेदनशीलता, जबाबदारी आणि अचूकता आवश्यक असल्याचे प्रतिपादन विजया रहाटकर यांनी केले.

राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित “महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान” या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महासंचालक तथा प्रधान सचिव दिजेश सिंह, सदस्य सचिव नंदिनी आवडे, वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता तसेच लेखिका डॉ. दरचा सूद उपस्थित होत्या.

रहाटकर यांनी सांगितले की, महिलांनी विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, प्रशासन आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी त्यांच्या समोर अनेक आव्हाने कायम आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांची भूमिका अधिक जबाबदारीची ठरते.

डिजिटल युगात बातम्यांचा वेग वाढला असला तरी पडताळणीशिवाय माहिती प्रसारित होण्याचा धोका वाढल्याचे त्यांनी नमूद केले. “बातमी लवकर देणे महत्त्वाचे असले तरी तिची विश्वासार्हता अधिक महत्त्वाची आहे,” असे सांगत फेक न्यूज रोखण्यासाठी तथ्य तपासणीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

महिलांविरोधातील गुन्ह्यांचे वृत्तांकन करताना योग्य भाषेचा वापर, पीडितेचा सन्मान आणि ओळख संरक्षण याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत पीडितेची ओळख उघड करू नये, असेही त्यांनी सांगितले.

माध्यमांनी महिलांचे चित्रण केवळ गुन्हेगारी घटनांपुरते मर्यादित न ठेवता सामाजिक, आर्थिक आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मीडिया ट्रायल टाळणे, न्यायप्रक्रियेचा सन्मान राखणे आणि तळागाळातील महिलांचा आवाज मुख्य प्रवाहात आणणे ही माध्यमांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, लेखिका डॉ. दरचा सूद यांनी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये पीडितेला न्याय मिळण्यासाठी सहाय्यकारी वृत्तांकन करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, वृत्तांकन करताना पीडितेच्या गोपनीयतेचे संरक्षण, सन्मान राखणे आणि दोषारोप टाळणे अत्यावश्यक आहे. ‘व्हिक्टिम’ऐवजी ‘सर्व्हायव्हर’ हा शब्द वापरण्यावर त्यांनी भर दिला.

त्याचबरोबर सकारात्मक बातम्यांना प्राधान्य देत महिलांच्या यशकथा आणि प्रेरणादायी प्रवास अधिक प्रमाणात प्रसिद्ध करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार स्वाती गुप्ता यांनीही “आपण आज जे लिहितो त्यावरून उद्याच्या पिढीची मानसिकता घडते,” असे सांगत माध्यमांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली.

कार्यशाळेला मुंबईतील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0