कोल्हापूर भूमी अभिलेख ‘हायटेक’; ३.६९ कोटींच्या यंत्रसामग्रीचे वितरण
कोल्हापूर जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागाचे कामकाज अधिक वेगवान व पारदर्शक करण्यासाठी ३ कोटी ६९ लाखांच्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे वितरण करण्यात आले.
कोल्हापूर/प्रतिनिधी – जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाला आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून ३ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या अंतर्गत रोव्हर मशीन, लॅपटॉप आणि स्कॅनर यांसारख्या आधुनिक साधनांचे वाटप करण्यात आले. या नव्या यंत्रसामग्रीमुळे मोजणी, फेरफार आणि अभिलेख सेवा अधिक अचूक, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजीराव भोसले, उपजिल्हाधिकारी शक्ति कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले तसेच विविध प्रांताधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.
भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागत होता. तसेच यंत्रसामग्रीच्या कमतरतेमुळे कामकाजावर मर्यादा येत होत्या. या समस्येची दखल घेत जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला.
या निधीतून १८ रोव्हर मशीन, २६ लॅपटॉप आणि १४ स्कॅनरची खरेदी करण्यात आली आहे. यापूर्वी एका रोव्हरवर अनेक कर्मचाऱ्यांना काम करावे लागत होते, मात्र आता पुरेशा साधनांमुळे कामाचा वेग वाढणार असून प्रलंबित प्रकरणे जलद निकाली निघण्यास मदत होणार आहे.
पालकमंत्री आबिटकर यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, केवळ साहित्य वितरण न करता त्याचा प्रभावी वापर झाला पाहिजे. नागरिकांना या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आवश्यक आहे. यासाठी १० जून रोजी विशेष आढावा बैठक घेऊन यंत्रसामग्रीचा वापर आणि कामकाजातील सुधारणा तपासली जाणार आहे.
जिल्हा अधीक्षक शिवाजीराव भोसले यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यात भूमापनाची १०० टक्के कामे जीपीएस आधारित रोव्हर तंत्रज्ञानावर केली जात असून दरमहा सुमारे ५ हजार मिळकत नोंदी ‘ई-पीसीआयएस’ प्रणालीद्वारे ऑनलाइन पूर्ण केल्या जातात. नव्या यंत्रसामग्रीमुळे सेवा अधिक गतिमान आणि अचूक होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0