उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी राज्य शासनाचे तीन व्यापक एसओपी जारी
उष्णतेच्या वाढत्या लाटांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने तीन व्यापक एसओपी जारी केले असून असंघटित कामगार व उच्च-जोखीम जिल्ह्यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
मुंबई, दि. १४ :
राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे, विशेषतः असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने तीन व्यापक मानक कार्यपद्धती (SOPs) जारी केल्या आहेत. राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) रंग-कोडेड सतर्कतेच्या आधारे या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, उष्णतेमुळे होणारे आजार आणि मृत्यू कमी करण्यासाठी या उपाययोजना प्रभावी ठरणार असून असंघटित कामगार, खाण कामगार आणि अल्प उत्पन्न गटांना याचा मोठा लाभ होणार आहे.
या एसओपीमध्ये लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड या १५ उच्च-जोखीम जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
तीन एसओपींचा मुख्य आराखडा:
१) बाहेर काम करणाऱ्या कामगारांसाठी उपाययोजना :
रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी बॉय आणि रिक्षाचालक यांच्यासाठी कामाचे वेळापत्रक बदलणे, पाण्याचे ब्रेक, ओआरएस वितरण, सावलीची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा वाढविणे यांचा समावेश आहे.
२) खाण कामगारांसाठी विशेष उपाय :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाण कामगारांसाठी थंड विश्रांती केंद्रे, पाणीपुरवठा, वायुवीजन, कामाचे नियोजन, जॉब रोटेशन आणि उष्णता आजार ओळखण्यासाठी प्रशिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
३) उष्णता-प्रतिरोधक गृहनिर्माण :
घरांची थर्मल सुधारणा, कूल रूफ, हरित क्षेत्रे आणि हवामानानुसार नियोजन यावर भर देण्यात आला आहे. यासाठी तात्काळ, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
तात्काळ उपाययोजनांमध्ये जनजागृती, उष्णता नकाशे, थंड केंद्रे आणि कमी खर्चातील घर सुधारणा यांचा समावेश आहे. मध्यम कालावधीत गृहनिर्माण योजनांमध्ये कूल रूफ आणि ग्रीन स्पेसचा समावेश करण्यात येणार आहे, तर दीर्घकालीन उपायांमध्ये राज्य बिल्डिंग कोड आणि हवामान-संवेदनशील नियोजनावर भर दिला जाणार आहे.
या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, सिडको आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत केली जाणार आहे.
प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी सांगितले की, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी सहा महिन्यांच्या अभ्यासानंतर या एसओपी तयार करण्यात आल्या आहेत. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
राज्यातील तापमान काही ठिकाणी ४७ ते ४९ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत असल्याने सर्व जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उष्णतेविरोधी जनजागृती मोहिमाही राबवण्यात येणार असून या एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
1
Wow
0