कुष्ठरोग रुग्णालयातील वयोवृद्ध रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर नेमा; अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे निर्देश

ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयातील वयोवृद्ध रुग्णांच्या सहव्याधींवर उपचार व्हावेत यासाठी विशेष तज्ज्ञ डॉक्टर नेमण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले. रुग्णालय व केईएम विद्यार्थी वसतिगृहाच्या कामांचीही त्यांनी पाहणी केली.

Apr 24, 2026 - 20:31
 0  6
कुष्ठरोग रुग्णालयातील वयोवृद्ध रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर नेमा; अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे निर्देश
बृहन्मुंबई महानगरपालिका, डॉ विपिन शर्मा, ॲक्वर्थ रुग्णालय, कुष्ठरोग रुग्णालय, मुंबई बातमी, BMC News, KEM Hostel, वयोवृद्ध रुग्ण उपचार, मुंबई आरोग्य सुविधा,

मुंबई | दि. २४ एप्रिल

ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे दीर्घकाळ उपचार घेत असलेल्या वयोवृद्ध रुग्णांच्या सहव्याधींवर योग्य उपचार व्हावेत, यासाठी विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.

डॉ. शर्मा यांनी आज ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयाला आकस्मिक भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. पुरातन वास्तू असलेल्या रुग्णालय इमारतीतील अंतर्गत कक्ष, आंतररुग्ण विभागातील दुरुस्ती कामे तसेच बाह्यरुग्ण विभागातील सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.

रुग्णांशी संवाद, अडचणी जाणून घेतल्या

सध्या या रुग्णालयात ५५ रुग्ण उपचार घेत असून त्यात ३० पुरुष व २५ महिला रुग्णांचा समावेश आहे. डॉ. विपिन शर्मा यांनी रुग्ण कक्षांना भेट देत रुग्णांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वृद्धत्वामुळे निर्माण होणाऱ्या विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी विशेष सूचना दिल्या.

केईएम विद्यार्थी वसतिगृहाच्या कामांचीही पाहणी

रुग्णालय परिसरातील सेठ गो.सुं. वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाच्या ८०० विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृह इमारतीच्या कामांचीही त्यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी आवश्यक विद्युत जोडणीची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बाह्यरुग्ण विभागात दररोज ६० रुग्ण

सद्यस्थितीत रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे ६० रुग्ण उपचारासाठी येतात. मागील तीन वर्षांत १८०० हून अधिक रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेतला आहे. निदान झालेल्या रुग्णांवर नियमित उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

या भेटीदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार, ॲक्वर्थ रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. अमिता पेडणेकर, उपअधिष्ठाता डॉ. अविनाश खाडे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0